तळेगाव ढमढेरे : अखेरीस इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना कला विषयाला वाढीव गुण देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष विनोद इंगोले व प्रल्हाद साळुंके यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचा अनेक महिन्यांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव कलागुण मिळण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, तसेच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. काँग्रेस प्रदेश कमिटीचे प्रदेश सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने आज अखेर वाढीव कलागुण देण्याबाबत शासनाचे शालेय उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी शुद्धिपत्रक 16 जून 2021,रोजी निर्गमित करण्यात आले.
विशेष म्हणजे, एलिमेंट्री परीक्षा पास झाले. परंतु covid-19 मुळे इंटरमिजिएट परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनादेखील एलिमेंट्री परीक्षेचे ग्रेड गृहीत धरून वाढीव गुण देण्याबाबत निर्णय झाला आहे.ज्या विद्यार्थ्यांचे बोर्डाचा प्रस्ताव सादर आहेत त्यांनादेखील वाढीव कलागुण मिळणार आहेत. शासनाने विद्यार्थी हितार्थ हा निर्णय घेतला तो फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे, यातून विद्यार्थ्यांना त्यांनी आत्मसात केलेले कलागुण मिळाल्याचा नक्कीच आनंद होणार आहे. त्यातून त्यांना टक्केवारी मध्ये देखील वाढीव गुणांचा फायदा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाने विद्यार्थी हितार्थ माननीय तंत्र शिक्षण मंत्र्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे.
रेखाकला परीक्षेचे वाढीव सवलतीचे गुण या वर्षी विद्यार्थ्यांना मिळावे या करिता महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचा शासन स्तरावर गेल्या १ महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, कलासंचालक यांचे सोबत संघटनेचे राज्य अध्यक्ष विनोद इंगोले, सरचिटणीस प्रल्हाद साळुंके यांनी प्रत्यक्ष संपर्क करून उच्च व तंत्र शिक्षण खात्याकडून याबाबत सकारात्मक निर्णय करून घेऊन पुढील निर्णयाकरिता शालेय शिक्षण मंत्री महोदयांकडे फाईल सादर करण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनाही ४ जून २०२१ रोजी संघटनेच्या वतीने निवेदन दिले होते. सदर निवेदनावर सकारात्मक योग्य अभिप्रायासह शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे सादर केल्याची माहिती खासगी सचिव राहुल मोहोड यांनी दिली. याबाबतचा निर्णय शालेय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्याकडून सकारात्मक निर्णय आता झालेला आहे.
महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष विनोद इंगोले, सरचिटणीस प्रल्हाद साळुंके, प्रदेश उपाध्यक्ष माननीय किरण सरोदे, प्रदेश सहचिटणीस मिलिंद शेलार आदी पदाधिकाऱ्यांनी कला विषयाच्या गुणवाढीसाठी प्रयत्न केले.