पुणे : भारताला कृषी, शिक्षण, अध्यात्म, तंत्रज्ञान आदी सर्वच क्षेत्रांत मोठी समृद्ध परंपरा लाभलेली आहे. त्याच समृद्ध परंपरेचा वारसा लक्षात घेऊन सुजलाम्, सुफलाम् बरोबरच आरोग्यवर्धम् ही संज्ञा रूढ व्हावी, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डाॅ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ विधिज्ञ, विचारवंत, ॲड. भास्करराव आव्हाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ॲड. भास्करराव आव्हाड पुरस्काराने डाॅ. अविनाश भोंडवे यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष डाॅ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर आडकर फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, डाॅ. भास्करराव आव्हाड यांचे बंधू ज्येष्ठ विधिज्ञ लेखक डाॅ. ॲड. सुधाकरराव आव्हाड आणि ॲड. भास्करराव आव्हाड यांचे चिरंजीव महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. अविनाश आव्हाड उपस्थित होते.
डाॅ. भोंडवे म्हणाले, कोरोना हे महामारीचे संकट सर्वांनाच नवीन होते. आम्हालादेखील रोज जागतिक आरोग्य संघटनेकडून अद्ययावत माहिती येत होती. त्यामुळे सुरुवातीला सर्वच स्तरावर गोंधळाचे वातावरण होते. वैद्यकीय माहिती ही किचकट स्वरूपात येत असल्याने त्याचे सुलभीकरण करून समाजात पसरलेली भीती आणि अस्वस्थता कशी कमी करता येईल या दृष्टीने मी लेखन आणि प्रबोधन करीत गेलो. सुशिक्षितांमध्येदेखील आरोग्याविषयी अज्ञान पाहून आरोग्य क्षेत्रात अजूनही आपणांस बराच मोठा पल्ला गाठायचा आहे हे लक्षात आले. बालमृत्यू, गरोदर महिलांचे आरोग्याचे प्रश्न तसेच ज्येष्ठांच्या आरोग्याबाबतचे प्रश्न अनेक आहेत. त्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आरोग्य साक्षरता वाढविणे आवश्यक आहे.
डाॅ. पी.डी. पाटील म्हणाले, समाज भांबावलेल्या अवस्थेत असताना डाॅ. अविनाश भोंडवे यांनी त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले. अवघड काळात ते उभे राहिले.
यावेळी ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले, तर उद्धव कानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मानले.