लोणी काळभोर : पुणे सोलापूर महामार्गावर थांबलेल्या पिकअपला मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिली. त्यामुळे झालेल्या तीन गाड्यांच्या विचित्र अपघातात पिकअप व ईर्टिका चालक मृत्यूमुखी पडले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात पिकअप चालक ओमकार दत्तात्रय पाळेकर (वय २३) व रा ता. माढा, जि. सोलापूर व इर्टिका चालक सुनिल भिमराव पवार (वय ४०, रा फुलचिंचोली ता पंढरपुर जि सोलापुर) हे दोघे मृत्यूमुखी पडले आहेत. तर मंगेश बकट खोचरे (वय २२) व सर्फराज खलीद जहागीरदार (वय २३, दोघेही ता. माढा, जि. सोलापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रोहीत शंकर गोसावी वय १७, रा दहीवळी गाव निमगाव रोड, एमएसईबी कार्यालयाजवळ, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पळून गेलेल्या ट्रकचालकाविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ एप्रिल रोजी सचिन खोचरे यांचे कलींगड गुलटेकडी पुणे येथे विक्री करण्याकरिता आले होते. खोचरे यांच्यासमवेत रोहीत गोसावी, सर्फराज जहागीरदार व ओमकार दत्तात्रय पाळेकर पिकअप मधून निघाले. त्यावेळी पिकअप ओमकार चालवत होता.
रात्री ११ वाजण्याच्या सुमारांस ते सोलापुर पुणे महामार्गावरून कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ग्रॅड 11 हॉटेल समोर आली. त्यावेळी पुढे असलेल्या इर्टिका कार क्रमांक एमएच डीई ९०१८ च्या पुढे वाहणे थांबलेली असल्याने इर्टिका कारचालक पवार यांनी ब्रेक लावला. त्यामुळे पिकअप चालक पाळेकर यांनीही गाडी थांबवली. यावेळी दोन्ही गाड्या एकमेकांना घासल्या म्हणून सर्वजण खाली उतरुन पाहणी करीत होते. त्याचवेळी अचानक मोठा आवाज झाल्याने त्यांनी पाहिले असता त्यांना सिमेंटच्या ट्रकने पिकअपला जोरदार धडक देऊन इरटिगा वाहनास धडक दिल्याने पाळेकर, खोचरे, जहागीरदार हे जखमी झाल्याचे दिसले.
त्यांना स्थानिक लोकांच्या मदतीने उपचारासाठी लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटल येथे नेले असता पाळेकर यास डॉक्टरांनी तपासुन दाखल मृत्यू झाल्याचे घोषित केले. या अपघातात जहागीरदार यास डोक्यास, उजव्या भुवईजवळ, छातीस तर खोचरे यास अंगावर खरचटलेले असुन पायास मार लागलेला आहे. तसेच चालक पवार यांना ससुन रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक अपघाताची खबर पोलीसाना न देता, जखमीना वैद्यकीय मदत न देता पळुन गेला आहे.