धायरी: मुंबई- बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. एका कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील दुभाजकाला धडकून कंटेनर पलटी झाला. यामध्ये चालक जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, साताराकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनर नवले पुल परिसरात आल्यानंतर कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि महामार्गावरील रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकाला धडकून कंटेनर पलटी झाला. अपघात एवढा भीषण होता की, चालकाच्या केबिनचा अक्षरशः चुराडा झाला. यामध्ये चालक जखमी झाला असून त्याला जवळच्या मोरया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शिंगाडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने पोहचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी चालकाला बाहेर काढले. क्रेन च्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन काढण्याचे काम सुरू असून महामार्गावर वाहनांच्या रांगा लांबवर लागलेल्या आहेत.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही....
सकाळी नऊ दरम्यान कामांवर जाणाऱ्यांची लगबग सुरू असते. यावेळी नवले पुल परिसरातील महामार्गावर रोज गर्दी असते. मात्र आज महामार्गावर अपघात घडला त्यावेळी आजूबाजूला कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातग्रस्त कंटेनर ची अवस्था पाहिल्यानंतर अपघाताची भीषणता लक्षात येते आहे.