बाभुळगाव: इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच व महिला सरपंच यांच्या पतीसहित नऊ जणांच्या टोळक्याने हातात तलवारी नाचवत गावात दहशत निर्माण केली. त्यानंतर बाभुळगाव चौकातील गाळे बळकावण्याच्या उद्देशाने तीन जणांवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. याबाबत दत्तात्रय शहाजी उंबरे (वय ३४ रा. बाभुळगाव) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नागनाथ दिवा गुरगुडे (विद्यमान उपसरपंच बाभुळगाव), सोमनाथ शिवाजी जावळे (विद्यमान महिला सरपंच यांचे पती), नितिन गोरख भोसले तीघे (रा.बाभुळगाव), माऊली दत्तु खबाले (रा.भाटनिमगाव), स्वप्निल घोगरे (रा.सुरवड, ता.इंदापूर,) प्रकाश शिंदे (रा.अवसरी, ता.इंदापूर) व त्यांच्या सोबत (तीन अनोळखी इसम नाव पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून ते सध्या फरार झाले आहेत.
रविवार दिनांक ११ जुलैला सकाळी ११:३० च्या सुमारास उंबरे हे घराच्या अंगणात बसले होते. त्यावेळी बाभुळगावचे उपसरपंच नागनाथ दिवा गुरगुडे महिला सरपंच यांचे पती सोमनाथ शिवाजी जावळे हे हातात तलवारी घेऊन त्यांच्याजवळ आले. व त्यांना म्हणाले की, बाभुळगाव चौकातील गाळे आम्हाला दे नाहीतर तुझा मर्डर करतो. यावर उंबरे यांनी नकार दिला असता दोघांनी तलवारीने त्यांच्या डोक्यावर वार करत ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. तलवारीचा वार डोक्यात लागू नये म्हणून उंबरे यांनी तलवारीचे वार हातावर झेलले.
त्यावेळी त्यांचे वडील शहाजी दशरथ उंबरे व चुलत भाऊ रामचंद्र पोपट उंबरे हे घटनास्थळी भांडण सोडविण्यासाठी आले. त्यावेळी आरोपीसोबत आलेल्या साथीदारांनी त्या दोघांनाही मारहाण केली. तसेच उंबरे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन घेऊन जात असताना कुटुंबातील लोकांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत नमूद केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे हे करत आहेत.