पुण्याच्या सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील पिराजी नगर परिसरात शिवजयंती दिवशी एका तडीपार गुंडाने हातात कोयता घेऊन नाचत दहशत निर्माण केल्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोशन लोखंडे असे त्या तडीपार गुंडाचे नाव असून त्याच्याविरुद्ध शस्त्र जवळ बाळगणे, दरोडा, आदी प्रकारचे गंभीर गुन्हे याआधी दाखल आहेत. त्याला याच्या आधीही तडीपार केले होते. त्याला तडीपार करण्याची ही दुसरी वेळ आहे.
डान्स करीत असलेल्या ग्रुपमधे नाचत असलेल्या तरुणांपैकी एकाकडे पिस्तुलही दिसत आहे. तसेच यातील काहींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याने हे प्रकरण उजेडात आले आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांकडून अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून आले मात्र या व्हिडिओमुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तडीपार असणारे गुन्हेगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याचे माहित असूनही पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकात संतापाची लाट आहे.पूर्वी तडिपारीच्या नावाने गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण होत असे. अशा गुन्हेगारांना समाजदेखील आपल्या दैनंदिन व्यवहारापासून चार हात लांब ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. काळ बदलला तशी गुन्हेगार, पोलिस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजाचीही मानसिकता बदलत गेली. मात्र, तडीपारीचा कायदा आहे तसाच राहिला. यामुळे तडीपारीची कारवाई कागदावर भरीव वाटत असली तरी त्याचा प्रत्यक्षात कोणताही फायदा होत नसल्याचे अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे.