लोकमत न्यूज नेटवर्क
खोडद : हिवरे तर्फे नारायणगाव येथील देवजाळी मळ्यात बिबट्याचा वावर वाढला आहे. मादीसह चार बिबट्यांचे शेतकऱ्यांना नेहमी दर्शन होत असल्याने येथील नागरिक दहशतीत आहे. येथील पशुधनांवरील बिबट्याचे हल्ले वाढले आहे. चार दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्या शेळीचा मृत्यू झाला. यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
देवजाळी येथील शेतकरी प्रकाश कृष्णाजी मुळे यांच्या गोठ्यातील शेळ्यांवर चार दिवसांपूर्वी हल्ला केोला. शेळ्यांच्या आवाजाने प्रकाश मुळे यांनी बिबट्याला हाकलून लावले. तेथून हाकलून लावल्यानंतर त्यांच्या शेजारचे शेतकरी तुकाराम भिकाजी मुळे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याच्या मादीने हल्ला केला. मात्र, कुत्र्याच्या गळ्यात काटेरी पट्टा असल्याने कुत्र्याचा जीव वाचला.
बुधवारी (दि २१) सायंकाळी ६ वाजता येथील शेतकरी अजित गोविंद मुळे यांचे पाळीव कुत्र्याच्या पिलावर बिबट्याच्या बछड्याने हल्ला केला. त्याला तोंडात पकडून ऊसाच्या शेतात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण, यावेळी ग्रामस्थांनी आरडाओरडा करून कुत्र्याच्या पिलांची सुटका केली.
या परिसरात बिबट्याची मादी आणि तिचे दोन बछडे या भागातील शेतकऱ्यांनी अनेकवेळा पाहिली आहेत. या परिसरात ३ ते ४ दिवस बिबट्याच्या मादीने आपल्या बछड्यांसह वास्तव्य केले होते. नंतर गणेशनगर परिसरात तिने आपल्या बछड्यांसह आपला मोर्चा वळवला.
यामुळे नागरिक दहशतीत असून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
चौकट
आपले पशुधन जपण्यासाठी शेतकऱ्यांनी बंदिस्त गोठ्याचा वापर करावा. गोठ्यांना लोखंडी जाळी लावणे अधिक सुरक्षेचे ठरते. बिबट्याच्या मादीसोबत तिचे बछडे असल्यास शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तिच्या बछड्यांना आपण काही तरी धोका निर्माण करतोय भावनेतून ती चवताळू शकते.लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.
- अजित शिंदे ,
वनपरिक्षेत्र अधिकारी,जुन्नर