लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात संचारबंदी लागू असतानाही टोळक्यांकडून घोळक्याने फिरून दहशत पसरविण्याचे प्रकार सुरूच असून, सामान्यांच्या वाहनांच्या तोडफोडीचे सत्र कायम आहे. बिबवेवाडीतील इंदिरानगर परिसरात टोळक्याने दुचाकी आणि रिक्षाची तोडफोड केल्याची घटना घडली.
याप्रकरणी लक्ष्मण पळसकर (वय ५५, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ८ ते ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इंदिरानगर परिसरात २४ मे रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास आठ ते नऊ जण आले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. टोळक्याने दुचाकी तसेच परिसरातील एका रिक्षाची काच फोडली. परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करून टोळके तेथून पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करत आहेत.
शहरात कठोर निर्बंध लागू असताना वैमनस्य, तसेच किरकोळ वादातून हाणामारी, तोडफोडीच्या घटना वाढतच आहेत. महिनाभरात वेगवेगळ्या कारणांवरून शहरात अकरा खून झाले आहेत. खुनाचा प्रयत्न, मारामारी अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.