लोणी काळभोर : दहशतवादाने जगाला पोखरणे सुरू केले आहे. अनेक देशांना त्याच्या झळा बसत आहेत. दहशतवाद ही जगाला लागलेली कीड असून ही कीड कर्करोगासारखी आहे. या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जगातील सर्व शक्तींनी एकत्र यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर यांच्यातर्फे आयोजित तिसऱ्या ''पसोर्ना टेक्नो कल्चरल फेस्ट - २०१९" च्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी यावेळी प्रसिद्ध गायक रुपकुमार राठोड, प्रसिद्ध संगीतकार ह्दयनाथ मंगेशकर, भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी ग्रुप) अध्यक्ष हनमंत गायकवाड,अभिनेत्री गुरूप्रित चड्डा, प्रसिद्ध बॉलिवूड गायिका कविता पौडवाल, सर्जनशील कलाकार अनास्तासिया लिब्रा, एमआयटी शिक्षण संस्था समुहाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष मंगेश कराड, विश्वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका प्रा. ज्योती ढाकणे, कुलगुरू डॉ. सुनील राय, कुलसचिव शिवशरण माळी, आदिनाथ मंगेशकर, डॉ. किशोर रवांदे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात पाथ ब्रेकिंग व्यावसायिक ऑफ पसोर्ना पुरस्काराने बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनमंत गायकवाड यांना तर मेलॉडिक पसोर्ना आॅफ एमिन्स पुरस्काराने प्रसिद्ध गायक रुपकुमार राठोड यांना, करिश्माई नेता पुरस्काराने ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना सन्मानित करण्यात आले. मुंडे म्हणाल्या, जगात फोफावत चाललेला दहशतवाद ही मोठी समस्या बनत चालली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याने अत्यंत दु:ख झाले. याची मी निंदा करते. शहीद जवानांच्या परिवाराच्या दु:खात सरकार सहभागी आहे. आपल्या मुलांना सैनेत पाठविण्यासाठी धैर्य लागते, ते शहीद झालेल्या जवानांच्या आई आणि पत्नीने दाखविले. आंतकवाद हा कर्करोगासारखा आजार आहे. त्याला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आगामी काळात विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी हे घुमट काम करेल. सर्वांना हक्क आणि ताकद देण्याचे काम होते. लवकरच भारत हा जगातील सर्वशक्तीशाली देश बनेल. एमआयटीने दिलेल्या या पुरस्कारने सर्वांगीण कार्य ताकदीने करण्याची हिंमत दिली आहे. संगीत आयुष्याला आकार देते. काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी हल्ला हा भ्याड हल्ला आहे. याच्या निषेर्धात गायक रुपकुमार राठोड यांनी संदेसे से आते हे सुप्रसिद्ध गीत गाऊन शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. हनमंत गायकवाड म्हणाले, देशातील महत्वाच्या संस्था, संसद, पंतप्रधान यांचे घर आणि विविध सरकारी कार्यालय यांच्या स्वच्छतेची जबाबदारी आमच्यावर आहे. कृषी क्षेत्रातील अनेकांना आम्ही दुप्पट उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कर्करोगाच्या आजारापासून वाचविण्यासाठी अनेकांना मोफत सुविधा व हर्बल मेडिसन देण्याचे कार्य आमच्या हातून होत आहे. पुढच्या १२ वर्षात १० करोड नागरिकांच्या आयुष्यात बदल घडविण्याचा आमचा मानस आहे.दरम्यान गायिका कविता पौडवाल, अनास्तासिया लिब्रा, संगीतकार ह्दयनाथ मंगेशकर यांनी आपले विचार व्यक्त केले. कुलगुरू डॉ. सुनील राय यांनी प्रस्ताविक केले. अल्फिया कपाडिया आणि निखिल खत्री यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. किशोर रवांदे यांनी आभार व्यक्त केले.
दहशतवाद म्हणजे जगाला लागलेली कॅन्सरची कीड : पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 3:24 PM