पुणे:पुणे शहर पोलिसांनी पकडलेल्या २ दहशतवाद्यांनी राज्यातील अनेक शहरात रेकी केली होती. ते कोणत्याही हॉटेलमध्ये मुक्काम करण्याऐवजी तंबूत रहात असत. तसेच त्यांच्या लॅपटाॅप, मोबाईलमध्ये तब्बल ५०० जी बी डेटा आढळून आल्याचे राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात एटीएसने आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. मोहम्मद इम्रान युनूस खान आणि युनूस याकुब साकी (दोघे मुळ रा. रतलाम, मध्य प्रदेश) या एनआयएच्या दोन फरार दहशवाद्यांचा समावेश आहे. त्यांच्या तिसर्या साथीदाराचा अजून तपास लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठी अनेक पथके कार्यरत आहेत.
हे दोघे गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात वास्तव करुन होते. त्यांनी आपण ग्रॉफीक डिझायनर असल्याचे सांगत असले तरी त्यांचे शिक्षण १२ वीपर्यंतही झाले नसल्याचे एटीएसच्या अधिकार्यांनी सांगितले. या दोघांकडे ड्रोन सापडले असून त्याच्या सहाय्याने त्यांनी अनेक ठिकाणचे चित्रिकरण केले आहे. ते नेमके कोणत्या ठिकाणचे आहे, त्याचा फॉरेन्सिंग तज्ञ शोध घेत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मोबाईल, लॅपटॉपमध्ये पुणे जिल्हा व इतर ठिकाणचे गुगलचे स्क्रीन शॉट आढळून आले आहे. ते कशासाठी त्यांनी काढले होते, याचा तपास केला जात आहे.
अल सफा शी ३ वर्षांपासून संपर्कात
हे दोघेही पूर्णपणे ब्रेनवॉश केलेले कट्टर दहशतवादी असून त्यांच्याकडे आढळून आलेली कागदपत्रे व अन्य साहित्यावरुन ते अल सफा या दहशतवादी संघटनेशी ३ ते ४ वर्षांपासून संपर्कात असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या लॅपटॉपमध्ये जिहादी असे व्हिडिओ, पुस्तके, वैयक्तिक युट्युबवरील भाषणे, पीडीएफ केलेली कागदपत्रे आढळली. यावरुन त्यांना धर्मांध बनविले असल्याचा संशय आहे.
तंबूत मुक्काम
हे दोघे राज्यातील व पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी फिरले आहेत. त्या काळात त्यांनी एकदाच हॉटेलमध्ये राहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते नाव बदलून राहिले होते. अन्य वेळी कोठेही गेले तरी ते स्वत: तंबूबरोबर घेऊन जात व त्यात मुक्काम करीत. त्यामुळे ते कधीही रडारवर आले नसल्याचे एटीएसच्या अधिकार्यांनी सांगितले. या दहशतवाद्यांना मदत करणारे अनेक जण असून त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांच्याविषयी ठोस पुरावा एसटीएस गोळा करीत आहेत.
५०० जी बी डेटा
आपल्याकडील लॅपटॉपची क्षमता ही साधारण ५०० जी बी इतकी असते. एक चित्रपट साधारण १ जीबी इतका असतो. त्यांच्याकडील २ लॅपटॉप व मोबाईलमध्ये ५०० चित्रपटांइतका डेटा अशा प्रकारच्या वादग्रस्त व्हिडिओ, पुस्तके व इतर साहित्यांनी भरलेला आहे.