पुणे : आपण ‘ट्रान्सचाईल्ड’ म्हणजेच ट्रान्स वूमन, ट्रान्स मेन आहोत हे समजल्यावर शारीरिक आणि मानसिक गोंधळ उडतो. परंतु, समाजाकडून त्यांना स्वीकारले जात नसल्याचा अनुभव येताे. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये तृतीयपंथीयांना हीन वागणूक मिळत असल्याचे शिक्षण सोडून देण्याचे प्रमाण जास्त आहे. तुमच्या कुटुंबात असे मूल असेल तर त्याला आधार द्या, असे मत आयटी क्षेत्रात मनुष्यबळ संसाधान पदावर काम करणाऱ्या तृतीयपंथी प्रेरणा वाघेला यांनी व्यक्त केले.
पुणे स्त्री आरोग्य संघटनेतर्फे ‘तृतीयपंथीयांसमोरील आव्हाने’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. टिळक रस्त्यावरील आयएमए हाऊस येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मिनू अगरवाल, सरचिटणीस डॉ. वैशाली चव्हाण, क्लिनिकल सेक्रेटरी डॉ. चारुलता बापये, डाॅ. विनय कुलकर्णी यांच्यासह अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. यावेळी तृतीयपंथियांशी संबंधित विविध विषयांवरील चर्चासत्रेही आयोजित करण्यात आली होती.
वाघेला म्हणाल्या, ‘मी इतरांहून वेगळी असल्याचे समजल्यावर सुरुवातीला सर्वांसाठीच मोठा धक्का होता. मात्र, सुदैवाने कुटुंबाने कायम पाठिंबा दिला. पालक ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. मात्र, शाळेमध्ये खूप नकारात्मक अनुभव आले. कोणत्याही उपक्रमात सहभागी करुन घेतले जायचे नाही, कायम टिकाटिपण्णी ऐकावी लागायची.
डॉ. विनय कुलकर्णी म्हणाले की समाजाप्रमाणेच डॉक्टरांमध्येही तृतीयपंथियांबद्दल जाणीवजागृती निर्माण होणे आवश्यक आहे. एखादा आजार उदभवल्यास कोणत्या डॉक्टरला भेटावे, काय उपचार घ्यावेत, कोठे अॅडमिट व्हावे असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर असतात. डॉक्टर त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचे काम करु शकतात.’