आंबेठाण : खेड तालुक्यासह औद्योगिक भागातील गावांमध्ये कोरोना रुग्णाची संख्या प्रचंड वाढत चालल्याने परिस्थिती गंभीर झाली. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कंपन्यांनी सर्व कामगारांची आरटी-पीसीआर चाचणी करावी, तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच कंपनीतील उत्पादन करावे, अन्यथा ८ मेपासून कंपन्या बंद करण्यात येतील, असा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिला आहे.
एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनच्या क्षेत्रातील बहुतांश गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील यांनी प्रत्यक्ष कंपन्यांमध्ये जाऊन कोरोना संबंधी कामगारांचे टेस्ट केलेले रिपोर्ट मागितले असता, आम्हाला बंधनकारक नाही व आम्हाला कसलेही शासनाचे परिपत्रक आमच्यापर्यंत आले नाही. मग, आम्ही कशाला टेस्ट करायची अशी चुकीची उत्तरं कंपनी प्रशासनाकडून मिळाली आहेत. शंभरातल्या फक्त एकदोन कंपन्यांत कामगारांची टेस्ट केल्याचे निदर्शनास आल्याने हे प्रमाण किती नगण्य आहे. कंपनीत गेल्यावर कामगारांना मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग आदी सुविधा पुरवल्या जात नसल्याने समोर आले आहे.
वराळे, शिंदेगाव, सावरदरी, भांबोली आदी गावांचे सरपंचांसह सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ यांनी एकत्रित एमआयडीसीतील कंपनीत जाऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन येणाऱ्या ७ मे २०२१ पर्यंत सर्व कामगार वर्गाचे आरटी-पीसीआर टेस्ट करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सूचनांचे पालन न केलेल्या ८ मे २०२१ नंतर ग्रामपंचायत प्रशासनाकडून या कंपन्या बंद केल्या जातील, असा इशारा देण्यात आला आहे.
--
कोट
कंपन्यांनी राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार काम करावे. कंपन्या बंद ठेवणे हा पर्याय असू शकत नाही. कंपन्यांनी काही दिवसांसाठी कामगारांची राहण्या-जेवण्याची व्यवस्था करावी. कंपन्या बंद ठेवण्यात आल्या, तर कामगारांना त्या दिवसांचे पगार द्यावेत जेणेकरून रोजंदारीवर काम करणारे कामगार आपापल्या गावी जाणार नाहीत.
- अमोल पानमंद, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम विभाग.
--
९० टक्के कारखाने कामगारांची आरटी-पीसीआर तपासणी करत नाही. काहीजण रॅपिड ॲन्टीजन तपासणी करून लॅबकडून निगेटिव्ह रिपोर्ट मागतात. यामुळे कामगार मोठ्या प्रमाणावर संसर्गित झाले असून, त्यामुळे परिसरातील गावांना मोठा धोका पोहोचला आहे. तालुका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानेच सरपंचांनी कंपन्यांना तपासणी करण्याची विनंती आहे.
- शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्य.
--------------------------------------------------------
फोटो क्रमांक : ०४ चाकण कंपनी टेस्ट
फोटो -कंपनीचे कामगार तपासणी करण्याचे पत्र कंपनी अधिकाऱ्यांना देताना वराळे गावचे सरपंच व ग्रामसेवक.