कोरोना रुग्णाचा आकडा खाली येत असल्यामुळे भिगवण शहरात काही अंशी निर्बंध हटविण्यात आलेले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत किंचित गर्दी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. तर कोरोनाविषयक तज्ज्ञ डॉ. मंडळींनी दुसरी लाट ओसरत असतानाच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आकडा कमी होत असला, तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. याच कारणामुळे भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रांनी तिसऱ्या लाटेला प्रतिबंध व्हावा आणि रुग्णांची संख्या आटोक्यात राहावी यासाठी मास टेस्टिंग योजना सुरू केली आहे. भिगवण मच्छी मार्केट, भाजी बाजार, साखर वितरण ऑफिस तसेच मदनवाडी, चौफुला या गर्दीच्या ठिकाणी ही तपासणी करण्यात येत आहे. व्यापारी वर्ग आणि रिकामे फिरणारे नागरिक यांना थांबवून तपासणी करण्यात येत आहे. यासाठी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी एक पोलीस पथक आरोग्य विभागाच्या मदतीला दिले आहे.
आरोग्य विभागाच्या ॲम्ब्युलन्समध्ये आरोग्य सहायक अशोक मोरे, गणेश चौधर, लॅब टेक्निशियन सौदागर शिंदे,आरोग्य सेविका उषा यादव ,प्रतीक्षा वाघमारे ,वार्डबॉय तात्या करे यांनी विशेष परिश्रम घेत मदत केली.
भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी भिगवण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन करीत तिसऱ्या लाटेपासून आपल्या शहराला दूर ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.