पुणे : पुण्यातील रुग्णसंख्या मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कमी होऊ लागल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, चाचण्यांची संख्याही घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खासगी प्रयोगशाळांमधील दररोजच्या चाचण्या ३० टक्क्यांनी कमी झाल्याचे लॅबचालकांचे म्हणणे आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शहरात दर दिवशी १९ ते २२ हजार इतक्या चाचण्या होत होत्या. गेल्या तीन -चार दिवसांमध्ये हे प्रमाण ११ हजारांपर्यंत खाली आले आहे. शहरातील २० टक्के चाचण्या शासकीय केंद्रांमध्ये, तर ८० टक्के चाचण्या खासगी प्रयोगशाळांमध्ये होतात. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी झाले आहे. दररोज १०० जण चाचणीसाठी येत असतील, तर ते प्रमाण ६०-७० पर्यंत कमी झाले आहे.
-----
चाचण्या कमी झाल्यामागील कारणे -
१) रुग्णसंख्या कमी झाल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे प्रमाण घटले
२) एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी आरटीपीसीआर टेस्टची गरज नाही
३) रुग्णांचा दहा दिवसांचा होम आयसोलेशनचा कालावधी संपल्यानंतर त्यांना पुन्हा कोविड टेस्ट करण्याची गरज नाही. कंपन्यांकडूनही निगेटिव्ह रिपोर्ट देण्याचा नियम मागे
४) ताप, सर्दी अशी लक्षणे लगेच दिसताच चाचणी करायला जाणाऱ्यांचे प्रमाण घटले
५) दर १५ दिवसांनी टेस्ट करण्याचा निर्णय अनेक कंपन्याकडून रद्द
------
आरटीपीसीआर चाचणी करण्याकडे नागरिकांचा जास्त कल आहे. अँटिजन बरेचदा फॉल्स पॉझिटिव्ह किंवा फॉल्स निगेटिव्ह येत असल्याने या चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. लोकांमधील कोरोनाची भीती पुन्हा काहीशी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे दररोजच्या चाचण्यांचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी झाले आहे.
- बापूराव खोमाणे, लॅबचालक, पाषाण