पुणे : रशियातील ‘स्पुटनिक व्ही’ या कोरोनावरील लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना पुण्यातील नोबल रुग्णालयामध्ये सुरूवात झाली आहे. एकुण १७ स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे. या रुग्णालयासह केईएम रुग्णालयाच्या वढू येथील संशोधन केंद्रांमध्ये लवकरच तिसºया टप्प्यातील चाचण्यांना सुरूवात होणार आहे.
गॅमेलिया नॅशनल रिसर्च सेंटर आणि रशियन डायरेक्ट इनव्हेट्मेंट फंड यांच्याकडून ही लस विकसित केली जात आहे. भारताकडूनही ही लस खरेदी केली जाणार आहे. भारतात डॉ. रेड्डीज लॅबकडून या लसीच्या मानवी चाचण्यांना काही दिवसांपासून सुरूवात झाली आहे. या चाचण्यांसाठी पुण्यातील नोबल रुग्णालय व वढू येथील संशोधन केंद्राची निवड करण्यात आली आहे. ‘नोबल रुग्णालयामध्ये गुरूवारपासून लस देण्यास सुरूवात झाली असून १७ स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. हा लसीचा दुसरा टप्पा आहे. लसीच्या तिसºया टप्प्यामध्येही रुग्णालयात काही स्वयंसेवकांना लस दिली जाणार आहे,’ अशी माहिती रुग्णालयाच्या क्लिनिकल रिसर्च विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. राऊत यांनी दिली. दरम्यान, वढू येथील केंद्रामध्ये अद्याप चाचण्यांना सुरूवात झालेली नाही. या केंद्रांमध्ये तिसºया टप्प्यातील चाचण्या होणार आहेत, असे केंद्राचे डॉ. आशिष बावडेकर यांनी सांगितले.
------------------