‘एनसीईआरटी’ने शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होण्याची अट घातली. त्यामुळे २०१२ नंतर शिक्षक होण्यासाठी अनेक उमेदवारांनी टीईटी परीक्षा दिली. राज्य शासनाने वर्षातून दोन वेळा टीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे वर्षातून एकदाच ही परीक्षा घेण्यात आली. आतापर्यंत सहा वेळा टीईटीची परीक्षा झाली. या परीक्षांमध्ये एकूण ८२ हजार २९८ उमेदवार उत्तीर्ण झाले. परीक्षेच्या पेपर एकमध्ये ४२ हजार व पेपर दोन मध्ये ४३ हजार उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने १५ डिसेंबर २०१३ रोजी पहिली टीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पेपर एकसाठी ३ लाख ८३ हजार ६३० तर पेपर दोनसाठी २ लाख ३५ हजार ७६१ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यात एकूण ३१ हजार ७२ उमेदवार उत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल २०१४ मध्ये मे महिन्यात जाहीर करण्यात आला. निकालाचे प्रमाणपत्र हे निकालाच्या तारखेपासून ७ वर्षांसाठी पात्र ठरणार असल्याचेही केंद्र शासनाने स्पष्ट केले. त्यामुळे पहिली परीक्षा दिलेल्या उमेदवारांची मुदत मे २०२१ रोजी संपली.
राज्यात २०१२ नंतर बंद असलेल्या शिक्षक भरतीवरील बंदी राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी उठवली होती. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पद्धतीने व्हावी यासाठी शासनाने पवित्र पोर्टल प्रणाली विकसित केली. या प्रणालीच्या माध्यमातून सुमारे ६ हजार उमेदवारांना शाळांमध्ये नोकऱ्या मिळाल्या. परंतु, शासनाने या प्रणालीमार्फतच पहिल्या टप्प्यात बारा हजार शिक्षकांची भरती करण्याचे जाहीर केले होते.
पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकियेत अर्ज केलेल्या उमेदवारांना टीईटी प्रमाणपत्राची मुदत संपली असली, तरी त्यांना या भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, यापुढील भरतीसाठी प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता शिक्षण अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
चौकट
राज्य परीक्षा परिषदेतर्फे मे महिन्यात टीईटी परीक्षा घेतली जाणार होती. परंतु, कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. तसेच केंद्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे टीईटी प्रमाणपत्राची मुदत सात वर्षे एवढीच आहे.
- तुकाराम सुपे, आयुक्त, राज्य परीक्षा परिषद, पुणे