टीईटी पेपरफूटी : तुकाराम सुपेकडे अजूनही रोख रक्कम सापडत असून ती कल्पनेच्या पलीकडील - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 07:35 AM2021-12-26T07:35:39+5:302021-12-26T07:36:10+5:30
सीबीआय तपासाची गरज नाही, कुणाचीही गय केली जाणार नाही - अजित पवार
पुणे : परीक्षा परिषदेतील टीईटी परीक्षेच्या गैरव्यवहाराचा तपास पुणे पोलीस योग्य पद्धतीने करत आहेत. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी, अशी मागणी केली जात असली तरी सध्या त्याची आवश्यकता नाही. गैरव्यवहार कुणाच्याही काळात झालेला असो, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटन समारंभानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, टीईटी पेपरफूट व गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी तुकाराम सुपेकडे अजूनही रोख रक्कम सापडत असून ती कल्पनेच्या पलीकडील आहे. या प्रकरणाचा खोलवर तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासातून अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. सीबीआयने केलेला तपास सुरुवातीला भरकटला होता. त्यानंतर शेवटी आत्महत्या केल्याचेच निष्पन्न झाले होते. हे विसरता येणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पवार म्हणाले, केंद्र शासनाने ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रातही गर्दी टाळण्याचे व कोरोनाविषयक सर्व नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे. एसटी संपामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे. तुटेल एवढे ताणू नये.
देशमुख, हरकळ यांची येरवड्यात रवानगी
म्हाडा भरती पेपरफूट प्रकरणातील डॉ. प्रीतीश देशमुख, अंकुश हरकळ आणि संतोष हरकळ यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना ॲड. योगेश कदम यांनी न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.