पुणे: राज्याच्या आरोग्य विभागातर्फे विविध पदांच्या भरतीसाठी घेतली जाणारी परीक्षाशिक्षण विभागाची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) एकाच दिवशी आल्याने गोंधळ निर्माण झाला. मात्र, शिक्षण विभागाने ‘टीईटी’ परीक्षेची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ‘टीईटी’ परीक्षा ३१ ऑक्टोबरऐवजी ३० ऑक्टोबरला घेतली जाणार आहे.
आरोग्य विभागातर्फे विविध पदांच्या भरतीसाठी २५ व २६ सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार होती. परीक्षा केंद्रांच्या गोंधळामुळे आणि परीक्षेच्या अपूर्ण तयारीमुळे आरोग्य विभागावर परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे आरोग्य विभागाने परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले. आता या परीक्षा येत्या २४ ऑक्टोबर व ३१ ऑक्टोबर रोजी घेतल्या जाणार आहेत.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘टीईटी’ परीक्षा १० ऑक्टोबर रोजी घेतली जाणार होती. त्या दिवशी युपीएससीची परीक्षा असल्याने ‘टीईटी’ परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. आता आरोग्य विभाग व ‘टीईटी’ परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी टीईटी परीक्षेच्या तारखेत बदल करण्याबाबत चर्चा केली. त्यानुसार ‘टीईटी’च्या तारखेत बदलण्यात आला आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणा-या ‘टीईटी’ परीक्षेच्या तारखेत बदलण्याचा निर्णय झाला आहे.या पूर्वी निश्चित झालेल्या तारखेच्या एक दिवस आधी म्हणजेच ३० आॅक्टोबर रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे, असे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष व आयुक्त तुकाराम सुपे यांनी सांगितले.