पुणे: ऑनलाईन पेपर कसे फोडावे याच्या विविध पद्धतीबाबत प्रशिक्षण देणारे केंद्र बिहारमधील पाटणा येथे असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. टीईटी गैरव्यवहार प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली असून, ऑनलाईन प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात देशभरातील दलालांची साखळी गुंतल्याचे उघडकीस आले आहे.
परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या काही तास अगोदर प्रश्नपत्रिका सर्व्हरवर डाऊनलोड करतात. गैरप्रकार करणारे सव्र्हरच्या गोपनीय क्रमांकात (प्रोगामिंग कोड) छेडछाड करून प्रश्नपत्रिका फोडतात. परीक्षा घेणारी कंपनी तसेच परीक्षा केंद्रातील काहीजणांशी संगनमत करून ठरावीक क्रमांकाच्या उत्तरपत्रिकेतील उत्तरे थेट ऑनलाईन बदलली जातात, असे पोलिसांच्या तपासात आढळून आले. त्यासंबंधी एक सविस्तर अहवाल सायबर पोलिसांनी तयार केला आहे. त्यातून पुणे पोलिसांनी काही निष्कर्ष काढले आहेत.
शासकीय परीक्षा खासगी कंपनीकडून न घेता शासनाकडूनच आयोजित करण्यात याव्यात. परीक्षा ज्या विभागाची आहे, त्या त्या विभागाच्या त्या जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेने परीक्षा आयोजित करावी. परीक्षा आयोजित करताना ज्या मूलभूत उपाययोजना आवश्यक आहेत. सीसीटीव्ही, व्हिडिओग्राफी यांचा प्रभावी वापर करावा. परीक्षा पेपर प्रिंटिंग करणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका संकलित करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे आणि त्यांचे संगणकीकरण करणे याची व्हिडिओग्राफी करणे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.