पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा ( टीईटी) घेणारेच पेपर फोडत असल्याचे समोर आले. त्यावर टीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण असून परीक्षा घेऊन आमची पात्रता ठरविणारे त्या पात्रतेचे नाहीत. त्यामुळे आता परीक्षा का द्यायची ? असा उद्विग्न सवालही विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
शिक्षक पात्रतेसाठी राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे अभ्यास करून टीईटी परीक्षा दिली. मात्र, या परीक्षेचे पेपर सातत्याने फोडले गेले होते. पैसे देऊन अनेक विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. परीक्षा परिषदेच्या आयुक्त यांनी पेपर फोडला. त्यामुळे आता पुढील परीक्षा तरी पारदर्शक पद्धतीने होतील का? असा प्रश्न निर्माण होतो.
परीक्षा उत्तीर्ण होणे हे केवळ आता पैसेवाल्यांचेच काम राहिले आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी अभ्यास करून उपयोग काय? आमचा शासनाच्या यंत्रणेवरील विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे यापुढील काळात परीक्षा द्याव्यात किंवा देऊ नयेत, असा विचार मनात येत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
सरकारने सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी
''टीईटी शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार आता उघड झाला असला तरी २०१३ पासून २०२० पर्यंत झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील सर्व प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) परीक्षेतही भ्रष्टाचार झाला असण्याची दाट शक्यता आहे. या सर्व प्रकरणांचा सरकारने सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी असे एमपीएससी समन्वय समिती समन्वयक सुरेश सावळे यांनी सांगितले.''
''गेल्या दोन वर्षांपासून मी टीईटी परीक्षेचा अभ्यास करत आहे; परंतु सातत्याने पेपर फोडला गेला असल्याचे समोर आल्यामुळे शासकीय यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे. परीक्षा घेऊन आमची पात्रता ठरविणारे अपात्र आहेत असा आरोप विद्यार्थिनी मेघ शिर्के हिने केला आहे.''
''मी सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते. मात्र, पोलीस भरती, आरोग्य सेवक, म्हाडा आणि आता टीईटी सर्वच परीक्षांचे पेपर फुटले. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान झाले असल्याचे विद्यार्थिनी रंजना होतकर म्हणाली आहे.''
पुण्यातून टीईटी परीक्षा देणारे उपस्थित विद्यार्थी
पेपर क्रमांक १ : १६,९०६
पेपर क्रमांक २ : १५,४१८
एकूण विद्यार्थी : ३२,३२४