पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर १)चा निकाल ४.२७ टक्के तर इयत्ता सहावी ते आठवी (पेपर)चा निकाल २.३० टक्के लागला आहे. सुमारे ९ हजार ५०० परीक्षार्थी पात्र ठरले आहेत.
परिषदेमार्फत दि. २२ जुलै रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभरातून १ लाख ५८ हजार २५० जणांनी पेपर एकची तर १ लाख १८ हजार ५६१ जणांनी पेपर दोनची परीक्षा दिली होती. त्यापैकी अनुक्रमे ६ हजार ७६३ व २ हजार ७३२ परीक्षार्थी पात्र ठरले आहेत. यंदा पेपर एकचा एकुण निकाल ४.२७ टक्के तर पेपर दोनचा २.३० टक्के निकाल लागला आहे. पेपर एकमध्ये मराठी माध्यमाचा निकाल सर्वाधिक ४.६० टक्के तर पेपर दोनचा २.४७ टक्के एवढा लागला आहे. इंग्रजी माध्यमाचा निकाल अनुक्रमे २.०२ टक्के आणि ०.४४ टक्के तर उर्दु माध्यमाचा अनुक्रमे १.१८ टक्के आणि ०.३० टक्के एवढा निकाल लागला आहे.
यावर्षी प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका आढळून आल्या होत्या. त्यामुळे परिषदेकडून संबंधित प्रश्न रद्द करण्यात आले होते. त्यामुळे रद्द केलेले प्रश्न वगळून उर्वरीत प्रश्न ग्राह्य धरून निकाल जाहीर करण्यात आला आहे. एकुण प्रश्नसंख्या व मिळालेल्या गुणांच्या आधारे टक्केवारी काढण्यात आली आहे. खुल्या गटातील परीक्षार्थींसाठी ६० टक्के तर इतरांसाठी ५५ टक्के गुणांचा निकष असून त्यानुसार निवड करण्यात आली आहे. खुल्या गटातील ज्या परीक्षार्थींनी ५९.५० टक्क्यांहून अधिक आणि इतरांना ५४.५० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले असतील तर त्यांनाही पात्र ठरविण्यात आल्याची माहिती परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली.
इयत्ता पहिली ते पाचवीसाठीचे पात्र शिक्षक
माध्यम परीक्षार्थी पात्र परीक्षार्थी टक्केवारी
मराठी १४२०५१ ६५२९ ४.६०
इंग्रजी ५१५२ १०४ २.०२
उर्दू ११०४७ १३० १.१८
एकूण १५८२५० ६७६३ ४.२७
इयत्ता सहावी ते आठवीसाठीचे पात्र शिक्षक
माध्यम परीक्षार्थी पात्र परीक्षार्थी टक्केवारी
मराठी १०८९७२ २६९६ २.४७
इंग्रजी ५१८७ २३ ०.४४
उर्दू ४४०२ १३ ०.३०
एकूण ११८५६१ २७३२ २.३०