पुणे: आरोग्य, म्हाडा पेपर फुटीनंतर आता टीईटीचे (TET Exam paper leak) पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले आहे. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना पेपरफुटी प्रकरणात अटक केली आहे. त्यामुळे आता आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनीच पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. कुंपणच शेत खात असल्याचे दिसून आले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आज दुपारी याबाबतची अधिक माहिती पत्रकार परिषदेत देणार आहे.
आरोग्य विभागाच्या पेपरफुटीचा तपास करीत असताना सायबर पोलिसांना म्हाडाच्या पेपरबाबतची माहिती मिळाली. म्हाडा परीक्षेचा पेपर फुटताना जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डा. प्रीतीश देशमुख व अन्य दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली. देशमुख याच्या घरझडतीत टीईटीच्या परीक्षार्थींचे हॉल तिकीट सापडले होते. त्याचवेळी टीईटीचा पेपर फुटल्याचा संशय वाढला होता.
त्यानंतर गुरुवारी सायबर पोलिसांनी राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पिंपरीतील त्यांच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे दिवसभर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली आहे.
विविध पेपरफुटी प्रकरणी राज्यात मागील काही दिवसांत अनेक अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रशासनातील या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. वर्षोंवर्षे अभ्यास करून लाखो विद्यार्थ्यी या परीक्षा देत असतात पण अशा प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते.