पुणे : समाजाने आम्हाला आमच्या जैविक ओळखीसह स्वीकारावे, शासकीय अर्जात, ओळखपत्रातही आमच्यासाठी वेगळा रकाना असावा, अशी आग्रही मागणी ट्रान्सजेंडर व्यक्तींकडून करण्यात येत होती. निवडणूक आयोगाने पुढाकार घेत मतदार नावनोंदणी अर्जात स्त्री, पुरुष आणि इतर असे रकाने केले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच अशी नावनोंदणी करण्यात आली. त्यात ४५ ट्रान्सजेंडर व्यक्तींनी नावनोंदणी देखील केली व यातील दहा व्यक्तींनीच मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीनंतर विशेष मोहीम राबवूनही त्यांच्या नोंदीचा आकडा वाढलेला नाही.गेल्या वर्षी मतदारयाद्यांची विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण मोहीम १६ सप्टेंबर ते ६ जानेवारी दरम्यान राबविण्यात आली. यात मतदार नावनोंदणी, दुबार व स्थलांतराचे नाव रद्द करणे, मतदार यादीचे वाचन करणे असे उपक्रम राबविले होते. समाजातील वंचित घटक समजला जाणारा पारधी समाज, खाण कामगार, तृतीयपंथी, देहविक्रय करणाऱ्या महिला, चरितार्थासाठी गावोगावी स्थलांतरित करणाऱ्या व्यक्तींची सरकार दरबारी नोंद नसते. परिणामी त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागते. त्या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वंचितांनी नोंदणी करण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. वंचित विकास संस्था, आशीर्वाद, भोई प्रतिष्ठान, परिवर्तन संस्थांची यासाठी मदत घेण्यात आली होती. या मोहिमेत ४५ ट्रान्सजेंडरांनी नावनोंदणी केली. मतदार यादीत ट्रान्सजेंडरांची माहिती इतर रकाना या नावाने देण्यात आली आहे. तर मतदार ओळखपत्रात त्यांची ओळख ट्रान्सजेंडर अशी आहे. या ओळखपत्राच्या आधारे त्यांना शासकीय योजनेमध्ये स्वत:ची ओळख सांगता येणार आहे.निवडणूक आयोगाने जून महिन्यात विशेष मतदार नावनोंदणी मोहीम राबविली होती. यात जवळपास तीन लाख मतदारांनी नावनोंदणी केली. आॅगस्टमध्ये निरंतर मतदार नाव नोंदणी मोहीम सुरू झाली आहे. यात एकाही ट्रान्सजेंडरची नोंदणी झालेली नाही.(प्रतिनिधी)
ट्रान्सजेंडरची मतदार नोंदणीकडे पाठ
By admin | Published: August 28, 2014 4:18 AM