पुणे : आगामी महापालिका निवडणुकांसाठी चार सदस्यीय प्रभागांचा प्रारूप आराखडा शुक्रवारी जाहीर करण्यात आला. प्रभागांची मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात आल्याचा आरोप राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. मात्र, या आराखड्यावर हरकती नोंदविण्याच्या पहिल्या दिवशी याला खूपच थंडा प्रतिसाद मिळाला. मुख्य भवन, निवडणूक विभाग तसेच ई-मेलवर एकही हरकत प्राप्त झाली नाही. सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्येही हरकती नोंदविण्यास खूप अल्प प्रतिसाद मिळाला आहे.प्रभागाच्या प्रारूप आराखड्यावर नागरिकांना लेखी हरकती नोंदविता याव्यात यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील स्वागतकक्ष, सावरकर भवनमधील निवडणूक विभाग, सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सुटीचा दिवस वगळून येत्या २५ आॅक्टोबरपर्यंत या सूचना नोंदविता येणार आहेत. त्यातील ५ सुट्यांचे दिवस वगळता आता हरकती नोंदविण्यासाठी केवळ ९ दिवस शिल्लक राहिले आहेत. हरकती स्वीकारायच्या की फेटाळून लावायच्या याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जाणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी अंतिम प्रभाग आराखडा प्रसिद्ध केला जाईल.प्रभागरचनेला उत्तर दिशेकडून सुरुवात करण्यात येऊन त्यानंतर पूर्वेला वळावे. पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि शेवट दक्षिण दिशेला करण्यात यावा, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
हरकती नोंदविण्यास थंडाच प्रतिसाद
By admin | Published: October 11, 2016 2:22 AM