पुणे : भारतीय चित्रपटांमध्ये अनेकदा थायलंडमधील दृश्यांचे चित्रीकरण पाहायला मिळते. थायलंडमधील चित्रसृष्टीतील प्रयोगशीलता, तेथील संस्कृती समजून घेण्याची संधी चित्रपटप्रेमींना उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वतीने ४ आणि ५ आॅगस्ट रोजी पुण्यात पहिल्यांदाच थाई चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.थाई चित्रपट महोत्सवात सहा पुरस्कारप्राप्त थाई चित्रपट पाहायला मिळणार आहेत. शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरामध्ये चित्रपटप्रेमी युवावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी, प्रेक्षकांना नव्या गोष्टी जाणून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मुंबईतील काऊन्सिल जनरल आॅफ थायलंडचे पोलपिपेट इकापोल उपस्थित होते.शुक्रवारी, दि. ४ आॅगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता थायलंडच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाºया सांस्कृतिक कार्यक्रमांनी चित्रपट महोत्सवास प्रारंभ होणार आहे. ‘द साँग आॅफ राईस’ हा चित्रपट महोत्सवात सुरुवातीला दाखवला जाणार आहे. चित्रपटानंतर दिग्दर्शक उरुफोंग रकसद यांच्याशी संवाद साधता येणार आहे. त्यानंतर, ‘इटर्निटी’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे आणि चित्रपटाचे दिग्दर्शक सिवारोज कोंगसकूल यांच्याशी वार्तालाप आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर ‘द स्विमर्स’ हा चित्रपट दाखवला जाईल.शनिवारी, ५ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता वंडरिंग, दुपारी १ वाजता अ गिफ्ट, दुपारी ४ वाजता द स्कार आणि आणि संध्याकाळी ६ वाजता स्नॅप हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. तरुणाईचे भावविश्व आणि प्रेमकहाणी यांचे प्रतिनिधित्व करणाºया चित्रपटांचा या महोत्सवामध्ये समावेश करण्यात आला आहे. चित्रपटांमधून थायलंडमधील ग्रामीण आणि शहरी संस्कृती, नातेसंबंध, तरुणाईचे भावविश्व आदींचे दर्शन होईल, अशी माहिती इकापोल यांनी दिली.
पुण्यात प्रथमच थाई चित्रपट महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:35 AM