पुणे : महापालिका प्रशासनाने कचरा वेचकांना विमा सरंक्षण द्यावे, घरटी कचरा गोळा करण्याचा दर काही महिन्यांसाठी वाढवावा, झोपडपट्टीतील कचरा गोळा करण्यासाठी पालिकेने ३० रुपये द्यावेत. आदी मागण्यांसाठी स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, कागद ,काच, पत्रा कष्टकरी पंचायतीने महापालिका भवनासह शहरात विविध ठिकाणी ' थाली बजाओ' आंदोलन करण्यात आले. कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायत आणि स्वच्छ संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनानंतर महापौर, आयुक्त कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कोरोनामुळे उत्पन्न घटले आहे. सेवाशुल्क निम्म्यावर आले आहे. कचऱ्यातून मिळणारे कागद, पत्रा, प्लॅस्टिक सारख्या वस्तू विकून काही हातभार लागायचा, परंतु कचऱ्यातून या वस्तु गायब झाल्याने ते उत्पन्न ही घटले आहे. त्यातच केंद्र सरकारने २०१८ मध्ये आम आदमी विमा योजना बंद केली आहे. महापालिका या विम्याचा हप्ता भरायची. त्यामुळे मागील दोन वर्षात मरण पावलेल्या कचरा वेचकांच्या वारसांना पालिकेने विम्याची रक्कम हस्तांतरित करावी. महापालिका हद्दीत सुमारे साडेसात हजार कचरा वेचक काम करत आहेत. त्यांना २ लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच पालिकेने द्यावे. १ एप्रिल २०२० पासून ही योजना लागू व्हावी. तसेच कोविड-१९ मुळे मृत्यू पावलेल्या सर्व कचरावेचकांना सरकारी नियमांप्रमाणे आयुर्विम्याचे लाभ द्यावा, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या. ------
१४ ऑगस्टपासून शहरात एक आठवडा कचरावेचक पांढऱ्या रंगाचे “शोषणापासून मुक्ती” पट्टे बांधून काम करत असून १७ व १८ ऑगस्टला पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासह ठिकठिकाणी विकेंद्रित पद्धतीने “थाली बजाओ” आंदोलन करणार आहेत,अशी माहिती यावेळी स्वच्छ सेवा सहकारी संस्थेच्या वतीने देण्यात आली.