पुणे - एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आणि राज्य सरकारचा आंदोलन संपवण्याचा हट्ट यात कर्मचाऱ्यांचं कुटुंबीय भरडले जात आहे. आधीच महागाई भत्ता आणि अॅडव्हान्स पे एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं दिला नाही. त्यातच पगारात नेहमीच होणारी अनियमितता यामुळे कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबाचा जीव मेटाकुटीला आलाय. म्हणून एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुबांनीही आंदोलनाच्या लढ्यात उतरण्याचा निर्णय घेतलाय.
स्वारगेट मधील एसटी कॉलनी येथे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आज सकाळी थाळीनाद केला. लहानांपासून ते वृध्दांपर्यंत सर्व यात सहभागी झाले होते. आधीच बारा-पंधरा हजार पगार असताना त्यातलेही चार ते पाच हजार टॅक्समध्ये कापले जातात. हाती येणारा पगार धड खायला पण पुरत नाही आणि धड राहायला पण पुरत नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी ही दशा महामंडळापुढे मांडण्याचा खूप प्रयत्न केला. पण बारा - तेरा तासांची निमूटपणे आहे त्या पगारात नोकरी करण्यावर महामंडळाने कर्मचाऱ्यांचा छळ चालवला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं कुटुंब सण समारंभही साजरे करु शकत नाही. मुलांना चांगलं शिक्षणही देऊ शकत नाही. या सर्व जाचाला कंटाळून आता एसटी कर्मचाऱ्यांचं कुटुंबही सरकारपुढे लढ्यासाठी उभं ठाकलं आहे.
राज्यभर होत असलेल्या या आंदोलनात प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याचं कुटुंब सामील झाल्यास सरकारपुढे मोठा पेच निर्माण होण्याची चिन्हं आहेत. उच्च न्यायलयात एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा आणि राज्य सरकारमध्ये विलनीकरणाचा तिढा सुटला नाही. परिवहन मंत्री अनिल परब यांनी खासगी वाहतूकदारांनी महामंडळ आगारात दिलेली एंट्री एसटी कर्मचाऱ्यांच्या स्वाभिमानावर पाय देणारी ठरली. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची चिन्ह आहेत.
शिवसाही, शिवनेरीच्या ब्रेकवर खासगी ठेकेदारांचा पाय - आता तर राज्य सरकारच्या कृपेने शिवनेरी, शिवशाही बसही खासगी ठेकेदारांच्या हाती गेल्या आहेत. रात्री उशीरापर्यंत ८ बस स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन येथून सुटल्या. हे आंदोलन मोडीत काढण्याच्या मार्गावर राज्य सरकार दिसत असलं तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध आता फुटला आहे हेही राज्य सरकारनं वेळीच समजून घेतलं तर परिस्थिती नियंत्रणात राहील.