धनकवडी : लॉकडाऊनमुुुळे आर्थिक विवंचनेला कंटाळून गेल्या काही दिवसात आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये कर्ता माणूस गमावल्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली. तर काहींना पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचवण्यात यश आले.पण तरीदेखील काही केल्या पुण्यातील आत्महत्येचे सत्र संपताना दिसत नाहीये. धनकवडी परिसरात देखील असा प्रकार घडला. मात्र पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे त्यांचा जीव वाचला.
आर्थिक विवंचनेला कंटाळून फेसबुकवर पोस्ट लिहिणाऱ्या ५४ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी शोधून त्याचं समुपदेशन करून त्याला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केलं. पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे या व्यक्तीला जीवदान मिळाले. ही घटना सोमवारी (दि २४) रात्री आठ वाजता भारती विद्यापीठ स्टेशनच्या हद्दीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार "मला जगण्याचा कंटाळा आल्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे... सर्वांचे मनापासून आभार... अशी फेसबुकवर पोस्ट पुण्यातील एका व्यक्तीने लिहिली आहे असा फोन परिमंडळ २ चे पोलीस उपआयुक्त शिरीष सरदेशपांडे यांना आला. पोलीस आयुक्तांनी या व्यक्तीला शोधून काढण्याचे आदेश दिले. यंत्रणा कामाला लागली आणि तांत्रिक तपास करून या व्यक्तीचं लोकेशन शोधले असता ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत होते. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुवर, गुन्हे शाखेचे विष्णू ताम्हाणे यांच्या आदेशानुसार पोलीस शिपाई हेमंत धायगुडे व प्रशांत लांबदांडे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या व्यक्तीचं समुपदेशन केलं आणि त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं.
ही व्यक्ती आपल्या पत्नी सोबत राहते, मुलीचे लग्न झाले असून आर्थिक ताण असह्य होत असल्याने वैफल्यग्रस्त होऊन पोस्ट केल्याची कबूली या व्यक्तीने दिली आणि पुन्हा असं कधी करणार नाही असं आश्वासनही पोलिसांना दिला.-----------------------