'शरद पवारांचे सहकार्य तर काँग्रेसचे आभार, पुण्यातील निवडीनंतर बोलले लोकसभा उमेदवार'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 01:36 AM2019-04-02T01:36:27+5:302019-04-02T07:16:44+5:30
काँग्रेस पक्षाच्या वतीने, पुणे लोकसभा मतदार संघासाठी, सांगोपांग विचार करून माझी उमेदवार म्हणून निवड करण्यात आली
पुणे - काँग्रेसने पुण्यातील लोकसभेचा उमेदवार देताना भाजपाला आव्हान दिले आहे. काँग्रसचे निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या आणि कार्यकर्ते ते नेता असा प्रवास असलेल्या मोहन जोशी यांना उमेदवारी दिली आहे. आपल्या नावाच्या उमेदवार निवडीनंतर जोशी यांनी राहुल गांधींसह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार, अजित पवार रिपल्बिकन पक्षाच्या नेत्यांचे सहकार्य लाभल्याचेही जोशी यांनी म्हटले. दरम्यान, जोशींच्या निवडीनंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने, पुणे लोकसभा मतदार संघासाठी, सांगोपांग विचार करून माझी उमेदवार म्हणून निवड करण्यात आली, त्याबद्दल मी कॉंग्रेस पक्ष, पक्षाध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, पदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण आणि सर्व संबंधितांचे मनापासून आभार मानतो, असे जोशी यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन म्हटले आहे.
माझ्या मते, लोकसभेची ही निवडणूक म्हणजे लोकशाही आणि संविधानाच्या दृष्टीने जीवन-मरण्याची आहे. ज्या पद्धतीने केंद्र सरकारने मागील पाच वर्षात ज्या एककल्ली, असंवेदनशील आणि एकाधिकारशाही कारभार केला, त्यामुळे लोकशाही, संविधान, मूलभूत स्वातंत्र्य, या सारख्या शाश्वत मूल्यांच्या रक्षणाची जबाबदारी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि सर्व मित्रपक्षांच्या आघाडीवर आली आहे. या विचारांच्या आणि संविधानाच्या रक्षणासाठीच्या लढाईत, काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या तळागाळातून वर आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवड करून माझ्यावर मोठी जबाबदारी सोंपवली आहे.
मागील 40 वर्षांहून अधिक काळ एक कामगार, श्रमिक पत्रकार, युवक काँग्रेसचा कार्यकर्ता आणि पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी जे कार्य केले आहे, त्याचा आणि काँग्रेस पक्षाच्या आणि आघाडीतील सर्व मित्रपक्षांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचाच सन्मान झाला आहे, अशी माझी विनम्र भावना आहे.
आजवर पक्षासाठी केलेले कार्य आणि पुणेकरांना ग्रासणा-या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी केलेल्या प्रयत्नांच्या आणि पक्का पुणेकर म्हणून असलेल्या माझ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यानुभव लक्षात घेता, पुणेकर मला पुणे शहराचे लोकसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करतील, असा मला आत्मविश्वास वाटतो.
प्रचंड आर्थिक ताकद, सत्तेची मगरूरी आणि मागील पाच वर्षातील गैरकारभाराला कंटाळलेले मतदार, मोदी सरकारच्या दिखाऊ, खोट्या आणि प्रचारकी कार्यावर नापसंतीची मोहोर उठवतील, याची मला खात्री वाटते. माझ्या उमेदवारीमुळे, शहरातील सर्व वयोगटातील आणि विशेषतः युवक-युवतींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.
समाजातील विविध धर्म, जात, पंथ, भाषा, प्रांतातील लोकांना बरोबर घेऊन, विकासाच्या वाटेवर चालण्याची क्षमता फक्त काँग्रेस पक्षातच आहे. या कार्यात मला लोकनेते आदरणीय शरदरावजी पवार, अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते; तसेच रिपब्लिकन पक्षासारखे मित्रपक्षांच्या नेत्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्यामुळेच, देशाचे भवितव्य ठरविणाऱ्या निवडणुकीच्या संग्रामात मला उत्तम यश मिळेल, याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. या सर्वांच्या बळावर मी मोदी सरकारच्या गैरकारभाराची लक्तरे मतदारांपुढे प्रभावीपणे मांडत असतानाच, पुण्याच्या आणि समाजातील सर्व घटकांच्या समग्र विकासाचा शहर पातळीवरील संयुक्त जाहीरनामा देखील मांडणार आहे.
पुणेकरांच्या सादेला प्रतिसाद देणारा मी कार्यकर्ता असून, या निमित्ताने शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचून लोकांशी संवाद साधण्याची आम्ही पराकाष्ठा करून, विजयश्री खेचून आणू, असा आम्हा सर्वांनाच विश्वास वाटतो, अशी फेसबुक पोस्ट लिहून जोशी यांनी आपल्या निवडीनंतर आनंद आणि विश्वास व्यक्त केला आहे.