लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील रुग्णसंख्या कमी होत असल्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी मग सरकारी यंत्रणेतील डॉक्टर, परिचारिका काम करत नव्हते का ते सांगावे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली. पुणेकर नागरिक संयमाने कोरोना निर्बंध पाळत आहेत त्याचेच हे यश असे ते म्हणाले.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील आता कामापेक्षाही बेजबाबदार वक्तव्यासाठी ओळखू जाऊ लागले आहेत, अशी टिपणी करत पत्रकार परिषदेत तिवारी म्हणाले, विभागीय आयुक्तांपासून सर्व वरिष्ठांनी वारंवार आदेश देऊनही महापालिका साधा डॅशबोर्ड विकसित करू शकलेली नाही. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अजूनही डॅशबोर्डची गरज आहे. हे अपयश झाकून कौतूक करता याचे पुणेकर म्हणून आश्चर्य वाटते.