"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 05:12 PM2024-09-22T17:12:55+5:302024-09-22T17:15:18+5:30
Supriya Sule : चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यानचा एक किस्सा सांगितला.
Supriya Sule Pune : लोकसभा निवडणुकीवेळी बूथ कमिटीसाठी नाव जाहीर केले की, तो माणूस दुसऱ्या दिवशी तिकडे (अजित पवार गटात) जायचा. त्यामुळे अशी परिस्थिती झाली होती की, अनेक ठिकाणी बूथ कमिटीसाठी माणसे नव्हती, असे सुप्रिया सुळे चिंचवडमधील एका कार्यक्रमात म्हणाल्या. यावेळी त्यांनी सहा दशकांपासून ज्यांच्याशी आमचे ऋणानुबंध होते, त्या घरी गेले तेव्हा त्यांनी तोंडावर दरवाजा बंद केला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली.
समरजितसिंह घाटगे यांनी कागल मतदारसंघातील पुणे-चिंचवडमध्ये असलेल्या मतदारांना समोर ठेवून कौटुंबिक स्नेहमेळावा आयोजित केला होता. चिंचवडे लॉन्समध्ये झालेल्या या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी हा प्रसंग सांगितला.
"माझ्या बाजूने ग्रामपंचायत सदस्यही नव्हते"
लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "माझ्या निवडणुकीत आमदार-खासदार तर विरोधातच, जिल्हा परिषद सगळी विरोधात. सोसायटी विरोधात, बँक विरोधात, दूध संघ विरोधात... सत्ता केंद्र असलेली प्रत्येक संस्था माझ्या विरोधात होती. रवि वरपेंनी माझी निवडणूक जवळून बघितली. ग्रामपंचायत सदस्यही नव्हते."
"बूथ कमिटीच्या नावासाठी जयंत पाटील रवि वरपेंना कॉल करायचे. रवि वरपे मला कॉल करायचे. बूथ कमिटीसाठी मी रवि वरपेला नाव दिलं की, दुसऱ्या दिवशी माणूस गायब. नंतर रवि वरपे म्हणायचे ताई नाव बदलायचे आहे. मी म्हटले का नाव बदलायचे, ते म्हणायचे तो गेला. मग रवि वरपेंनी चोरून बूथ कमिट्या करण्याची स्ट्रेटजी काढली. ते म्हणाले, नाव जाहीर केले की, तो तिकडे (अजित पवार) जातोय", असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.
"वरपे म्हणाले, तुमच्यात मलाच जोडे बसताहेत"
"जयंत पाटील रवि वरपेंना रागवायचे आणि ते मला डाफरायचे की, तुमच्यामध्ये मलााच रोज जोडे बसताहेत. मग मी जयंत पाटलांना फोन केला की, आमच्याकडून बूथ कमिट्या होणार नाही. कारण नाव जाहीर केले की, गडबड होतेय. ते म्हणाले असे चालणार नाही. मग म्हटले करतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल अनेक ठिकाणी बूथ कमिटीला माणूस नव्हता", असा अनुभव सुप्रिया सुळेंनी सांगितला.
"त्या माणसाने तोंडावर दरवाजा बंद केला, पण..."
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "माझी आणि श्रीनिवास पवारांची आठवण तर मी आयुष्यात विसरणार नाही. आम्ही एका घरी गेलो. आमच्यात सहा दशकांचे ऋणानुबंध. आम्ही गेलो, हात जोडले. त्यांनी दरवाजा उघडला. ते म्हणाले, 'तुम्ही आलात.' आम्हाला वाटले आत बोलावतील. पण, ते म्हणाले, 'आम्हाला बाहेर जायचे आहे. आज भेटायला नको.' आम्ही म्हणालो अहो आम्हाला फक्त... ते म्हणाले, 'नको नको.' आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला, पण बारामती लोकसभा मतदारसंघात एक नंबरचा बूथ त्या माणसाचा होता. तो मला भेटला नाही, पण मतामध्ये त्याने त्याचा राग व्यक्त केला. मला मतदान केले", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.