बारामती : आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे बनावट पत्र तयार करून ते सामाज माध्यमांवर व्हायरल केले. मात्र, पोलिसांनी तपास न करता घाईघाईने पुण्यातून एका होतकरू तरुणाला अटक करून त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात तरुण हा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे. या तरुणाचा त्या बनावट पत्राशी कुठलाही थेट संबंध नाही. ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा लोकशाही मार्गाने आणि संभाजी ब्रिगेड स्टाईलने आम्हाला याविरुद्ध लढा उभा करावा लागेल,असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिला आहे.
याबाबत बारामती येथील संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे यांनी गायकवाड यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केलेल्या भुमिकेची माहिती दिली. त्यानुसार संभाजी ब्रिगेड ही शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर या महापुरुषांच्या विचारधारेला अनुसरून काम करणारी संघटना आहे. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते त्याच विचारधारेचा प्रचार आणि प्रसाराचे काम करतात. विद्यमान राज्य सरकारने नुकताच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण दिला आहे. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी खारघर येथे जवळपास १४ निष्पाप नागरिकांचा दुदैर्वी मृत्यू झाल्याची घटना घडली.
या घटनेला सर्वस्वी आप्पासाहेब धर्माधिकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत. परंतू झालेल्या घटनेची जबाबदारी झटकण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेत त्यांच्याविषयी रोष निर्माण झाला आहे. या रोषातून अज्ञात व्यक्तीने आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे बनावट पत्र तयार करून ते सामाजिक माध्यमांवर व्हायरल केले. त्या पत्रामध्ये पुढील निवडणुकांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारला मतदान करु नका असे आवाहन केले आहे. या पत्रामुळे आपली बदनामी झाल्याची तक्रार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पोलिसांकडे केली होती.
राज्याचे गृह खाते आणि पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास न करता केवळ कारवाई केल्याचे दाखवण्यासाठी घाईघाईने पुण्यातून एका होतकरू तरुणाला अटक करून त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. हे बनावट पत्र तयार करणारे नामानिराळे राहिले आणि विनाकारण एका सर्वसामान्य तरुणाला यात गोवण्यात आले आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात वैचारिक मतभेद आहेत. खारघर येथे झालेल्या निष्पाप लोकांच्या मृत्यूबद्दल किंचितही लवलेश नसणारे धर्माधिकारी आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी ओढूनताणून संभाजी ब्रिगेडसोबत या घटनेचे कनेक्शन जोडायचे या हेतूने आमच्या कार्यकत्यार्ला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. संभाजी ब्रिगेड या तरुणाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून कुठल्याही परिस्थितीत एका निर्दोष तरुणावर कारवाई आम्ही खपवून घेणार नाही,असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिला आहे.