पुणे : शिवसेना कामगार नेते रघुनाथ बबनराव कुचिक याच्याविरोधात 24 वर्षीय तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. कुचीकने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ती गरोदर राहिली. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करून त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार तरुणीने केली होती. त्यानंतर तरुणी गायब झाली आहे. त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचीकवर आरोप केला आहे.
''पुण्यात ज्या तरुणीने शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. ती तरुणी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची झाली आहे. शनिवारी या पिडीतेने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुणे पोलिसांच्या प्रसंगावधानाने त्या मुलीला वाचवण्यात यश आलं. पण आता मात्र ती मुलगी कुठेच सापडत नाही. त्या तरुणीला रघुनाथ कुचीकनेच गायब केलं आहे. असं त्या म्हणाल्या आहेत.
मुलगी जिथं कुठे आहे ती सुखरूप असावी
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार आणि पुणे पोलीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. बेपत्ता झालेल्या तरूणीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही आहे. तीचं आजचं लोकेशन पणजी दाखवत आहे ,पोलीस तसा तपास देखील करत आहे असे सांगत चित्रा वाघ यांनी ती मुलगी जिथं कुठे आहे ती सुखरूप असावी अशी प्रार्थना देखील केली आहे. त्याचारोबत त्यांनी रघुनाथ कुचीक यानेच त्या मुलीला बेपत्ता केलं नसेल ना? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
रुपाली चाकणकर यांच्यावर टीकास्त्र
त्याचबरोबर जी मुलगी बेपत्ता झाली आहे ती आमच्या संपर्कात आहे अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज सकाळीच दिली होती. त्यांच्या या विधानावर देखील चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली आहे.ती मुलगी बेपत्ता असताना देखील जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने असं बेजबाबदार विधान करून आपलं अडाणी पण दाखवू नये अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर केली आहे.