पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कुटुंब व्यवस्थित काळजी घेत होते, सर्व नियम पाळत होते. भाजी आणण्यासाठी बाहेर पडल्याचे निमित्त झाले आणि ६३ वर्षीय माजी उपशिक्षणधिकारी धनसिंग सूर्यवंशी यांना कोरोनाची लागण झाली.
सुरुवातीला त्यांना डोकेदुखी, अंगदुखी, ताप, खोकला, अशक्तपणा अशी सर्वच लक्षणे जाणवत होती. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना भारती हॉस्पिटलला ॲडमिट केले. मानसिकदृष्ट्या ते खूप खचले होते. मात्र, आता आजाराचा सामना करायचाच आहे तर धैर्याने सामोरे जायचे त्यांनी ठरवले. संपूर्ण कुटुंबाला कोरोनाने विळखा घातला होता. मात्र, सुदैवाने सर्वजण यातून सुखरूप बाहेर पडले.
सूर्यवंशी यांना अगदी पहिल्या दिवसापासून खोकल्याचा प्रचंड त्रास जाणवत होता. रक्तदाबाचा त्रास असल्याने रिस्क न घेता त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचा निर्णय घेतला. दाखल झाल्यावरही खोकल्याचा त्रास कमी झाला नव्हता, जेवण अजिबात जात नव्हते. तोंडाची चव जाणे, घसा कोरडा पडणे असे अनेक त्रास एका वेळी होत असल्याने ते मानसिकदृष्ट्या खचले होते. दुसरीकडे, धनसिंग सूर्यवंशी यांची पत्नी, मुलगा, सून, नातू यांनाही कोरोनाची लागण झाली. पत्नीला कोव्हीड सेंटरला ठेवण्यात आले. मुलगा आणि सून घरीच आयसोलेट झाले होते. डॉक्टरांचे प्रयत्न, औषधोपचार यामुळे ते कोरोनाच्या संकटातून सहीसलामत बाहेर पडले. कुटुंबीयांनीही कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली.
धनसिंग सूर्यवंशी म्हणाले, ''मी नियमितपणे योगा, प्राणायाम करत होतो. लोकांनी कोरोना झाला तरी घाबरून जाऊ नये. ग्रामीण भागात लोक अजूनही कोरोनाला घाबरतात आणि आजार लपवून ठेवतात. त्यामुळे संसर्ग पसरतो. कोरोनाच्या रुग्णांकडे पाहण्याचा लोकांचाही दृष्टिकोन बदलला पाहिजे. कोरोनाबद्दलची माहिती विविध माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असते. त्यापासून मी स्वतःला लांब ठेवले आणि त्यामुळे यातून बाहेर पडू शकलो. कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये आणि पडलेच तर सर्व काळजी घ्यावी, नियम पाळावेत.''