पुणे : इंदापूरमधून भाजपने अखेर हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर करून आपले वचन पाळले आहे. काहीच दिवसांपूर्वी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
२०१४साली तत्कालीन काँग्रेसमधून पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या सांगण्यावरून त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत काम केले. मात्र त्यावेळी त्यांना आघाडीतर्फे उमेदवारी देण्याचे वचन पाळले जाईल याची शाश्वती न मिळाल्याने त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. अनेक वर्ष काँग्रेसचे नेते आणि मंत्री म्हणून मंत्रिमंडळात काम केलेल्या पाटील यांच्या प्रवेशाने अनेकांना धक्का बसला होता. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजानदेश यात्रेचे नियोजनही त्यांनी केले होते. अखेर आज भाजपच्या पहिल्याच यादीत पाटील यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाले आहे. मात्र आता तिथे स्थानिक आमदार भरणे विरुद्ध माजी आमदार पाटील अशी 'हायवोल्टेज' लढत रंगण्याची शक्यता आहे.