पुणे: कोणीही काहीही बोलले की न्यूज चॅनेल हे दाखवायलाच बसले आहेत. महाराष्ट्रात एवढे प्रश्न आहेत तरी कोण काय बोलले, हेच सुरू आहे. मी काहीही बोलत नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणतात, मी मध्येच येतो आणि बोलतो त्याला ही कारणे आहेत. यामुळेच मी बोलतच नाही. जेव्हा दाखवणे बंद होईल. तेव्हा सर्वांची आपोआपच बंद होतील असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या वतीने शोध मराठी मनाचा या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात ठाकरे बोलत होते. त्यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ व्यंगयत्रिकार प्रभाकर वाईरकर आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी घेतली. त्यात ठाकरे यांनी व्यंगचित्रकला, तिचे भवितव्य, मुस्कटदाबी, सध्याचे राजकारण, बेरोजगारी यावर परखड मते मांडली. स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील आणि यशराज पाटील यांनी ठाकरे यांचा सत्कार केला.
बडबड करण्याचे राजकारण
राज ठाकरे म्हणाले, ‘‘सध्या राज्यात सुडाच्या राजकारणापेक्षा बडबड करण्याचे राजकारण सुरु आहे. राजकारणात येऊ पाहणारी पिढी याकडे गंभीरपणे पाहत आहे. रोज सकाळपासून वृत्तवाहिन्यांवर पकपक सुरु होते. यातून नवीन पिढ्या काय आदर्श घेणार? हे पाहून राजकारणात यायचे की नाही, याबाबत नवी पिढी संभ्रमात आहे.’’
प्रत्येक राज्य हे समान मुलासारखे असले पाहिजे
राज्यघटनेने संघ राज्याची चौकट तयार केली आहे. देशातील एकाच विशिष्ट राज्याला प्राधान्य देणे हे चुकीचे नाही का?, यावर ठाकरे म्हणाले, ‘‘हे मी आधीच बोललो आहे. तेव्हा सर्वांचा शहामृग झाला होता. सगळ्यांनी माना आत घातल्या होत्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिले पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य हे त्यांच्यासाठी समान मुलासारखे असले पाहिजे. आपण स्वत: गुजराती आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणे, हे एका पंतप्रधानाला शोभत नाही. मनमोहन सिंग पंजाबचे म्हणून सर्व पंजबला, उद्या तमिळ पंतप्रधान होईल म्हणून सर्व तमिळनाडूला देईल, ही कुठची पद्धत आहे.’’