पुणे : आज आरक्षणाची लढाई सुरू आहे. रोज अल्टिमेट दिला जात आहे. गोंधळ चालला आहे. मूळ कारण काय आहे तर रोजगार मिळाला असता तर हे आंदोलन झालं नसतं. रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हायला हवे होते. पण आज बेरोजगारी आहे. हाताला काम नसले की आंदोलन, चळवळ सुरू होते. त्यातून हिंसक वळण लागते, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
पुणे नवरात्र महोत्सवामध्ये दरवर्षी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा ‘महर्षी’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदा भारतीय परराष्ट्र खात्याचे माजी सचिव ज्ञानेश्वर मुळे यांना प्रदान केला. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र इंडस्ट्री विकास असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार संजय जगताप, माजी आमदार उल्हास पवार, आबा बागूल, जयश्री बागूल आदी उपस्थित होते.
साळुंखे म्हणाले, राज्यात राजकारणाचे पुढे काय होणार याची चि़ंता लागली आहे. चांगले मजबूत सरकार असेल तर गुंतवणूक येऊ शकते. उद्योगजगताला स्थिरता येण्यासाठी राजकारण महत्वाचे आहे. उद्योगाची वाढ व्हायची असेल तर गुंतवणूक करणारे लोकं महाराष्ट्रात आले पाहिजेत.
मुळे म्हणाले, अधिकारी झाला म्हणजे तो हवेत असतो. पण मला माझ्या आईवडिलांनी जे संस्कार दिले त्यातून मी घडलो. महाराष्ट्राने मला घडवलं. म्हणून मी आजही जमिनीवरच आहे. आज आपला शत्रू कोणता असेल तर ते जाती आहेत. जाती नष्ट करणारा कायदा आणायला हवा. सर्वजण आपण समान आहोत. खरंतर आज आपण जातीयवादी होत चाललो आहोत. ही शोकांतिका आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भारताला प्रगत करायचे आहे, पण आज वास्तव वेगळे आहे. घोषणा देऊन होणार नाही. देशाला आज खूप कर्ज काढावं लागतं. भरमसाठ कर लावतात. या सरकारने ३० लाख कोटी मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी आहेत. ३० लाख कोटी गोळा केले तरी भागत नाही. म्हणून आता कंपन्या विकल्या जात आहेत. आता तर सैन्याला निवृत्ती वेतन द्यावे लागते म्हणून रेग्युलर आर्मी बंद केली. आता तात्पुरती भरती होणार आणि तीन वर्षं कामावर ठेवणार. त्यानंतर रस्त्यावर सोडून देणार. हे कशासाठी तर पेन्शनचा खर्च होऊ नये म्हणून एका बाजूला मोठ्या घोषणा होत आहेत, मोठी आर्थिक शक्ती आपण आहोत. पण नेमकं चाललंय काय हे आपण पाहत आहोत. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास १८३ टक्के झाला आहे. पण आता देशाचा विकास केवळ ८३ टक्के झाला आहे. या नऊ वर्षांत आपल्या विकासाची गती कमी झाली आहे. म्हणून नोकरी नाहीत. मग दंगा करा, आंदोलन करा, असे सुरू आहे.