पुणे : यंदा ६ जून रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय भव्यदिव्य साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा...स्वराज्याच्या इतिहासाचा’, सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण आहे, तसेच ३५० सोन्याच्या होनने शिवराज्याभिषेक होईल, अशी माहिती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोन्याचे होन तयार करण्याचा मान चंदुकाका सराफ ॲन्ड सराफ प्रा. लि. कंपनीला देण्यात आला आहे. त्यांच्याकडून ३५० होन तयार केले असून, त्याचे अनावरण या वेळी संभाजीराजे छत्रपती आणि चंदुकाका सराफचे संचालक सिध्दार्थ शहा यांच्या हस्ते झाले. या वेळी स्वराज्यचे पदाधिकारी धनंजय जाधव, मालोजीराजे जगदाळे, निखिल काची आदी उपस्थित होते.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले,‘‘दुर्गराज रायगडावर शिवरायांचा ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. हा सोहळा ऐतिहासिक असून, जगभर साजरा व्हावा यासाठी यंदाचा ३५० वा राज्याभिषेक जल्लोषात आणि मोठ्या थाटात होणार आहे. गडावर ५ जून रोजी सायंकाळी ४ वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत व शिवभक्तांच्या समवेत नाणे दरवाजा येथून गड चढण्यास प्रारंभ होईल. त्यानंतर नगारखाना येथे गडपूजन व २१ गावातील सरपंच व पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या हस्ते होईल.
६ जून रोजी सकाळी ७ वाजता नगारखाना येथे रणवाद्यांच्या जयघोषात युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजपूजन, ध्वजारोहन होईल. त्यानंतर शाहिरी कार्यक्रम होईल. सकाळी १० वाजून २० मिनिटांनी शिवछत्रपती महाराजांचा सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होईल. शिवरायांच्या समाधीस अभिवादन करण्यात येईल.
''गडावर महाराष्ट्रातील युध्दकला आखाड्यांचा सहभाग असेल. पारंपरिक युध्दकला कशी असते, त्याचे दर्शन येथे होणार आहे. पट्टा, तलवार, भाला, वीटा, जंबिया, कट्यार, माडू, फरी गलका यांच्या विविध प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. पालखी मिरवणूकीत बारा बलुतेदार, अठरा अलुतेदारांसह सर्व धर्मातील लोक सहभागी होतील. - युवराज संभाजी छत्रपती महाराज''