वरवंड : ता-दौड पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन एसटी बसेसचा अपघात होऊन दोन ठार तर जवळपास ४० ते ५० जण जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये नामदेव बाबुराव आढाव (वय ७८, रा. चिंचपूर, आष्टी, बीड) व सुवर्णा संतोष होले (वय ३८, रा. बिरोबावाडी पाटस ता. दौंड) हे दोघे या अपघातातानंतर उपचारादरम्यान ठार झाले आहेत. तसेच अपघातमध्ये ४० ते ५० जण किरकोळ, व तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे - सोलापूर महामार्गावर असणाऱ्या वरवंड गावाजवळील कौठीचा मळा येथे घडला. वरवंड गावच्या हद्दीत असणाऱ्या कौठीचा मळा या ठिकाणी या दोन एसटी बसचा समोरासमोर भीषण अपघात घडला.
सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला एक दुचाकीस्वार आडवा आला त्यास वाचविण्यासाठी ती बस दुभाजकाच्या दुसऱ्याला बाजूला गेल्याने समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला ती जाऊन धडकली. या अपघातात दोन्ही बसेसमधील साधारण ४० ते ५० प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच बस क्रमांक (एमएच ११ बीएल ९४११) ही जामखेड - स्वारगेट ही गाडी सोलापूरकडून ते पुणेकडे जात असताना एक दुचाकी आडवी गेल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्नात पुणेकडून येणारी बस (एमएच १४ बीटी ३३७९) पुणे - तुळजापूर या गाडीला जाऊन धडक दिली. या दोन्ही गाडीतील चालक व वाहक गंभीर जखमी झाले आहेत, असे तीनजण गंभीर जखमी असल्याचे बोलले जात आहे. या अपघातात दोनजण ठार झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.