पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत परिसरात राहणाऱ्या एका ४६ वर्षीय व्यक्तीला सोशल मीडियावरून एका अनोळखी महिलेचा फोन आला. संबंधित महिलेने गोड बोलत वारजे माळवाडी येथील एका हॉटेलमध्ये तक्रारदाराला भेटण्यास बोलवले. मात्र त्या हॉटेलवर तक्रारदार आल्यानंतर त्याला सायबर पोलिस असल्याचे सांगत लुटल्याचा प्रकार उघडकीस आला होता. राजन ज्ञानेश्वर कोल्हे (४६. रा. रावेत) यांनी याप्रकरणी १६ ऑगस्ट रोजी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी हनिट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या तिघांचा तात्काळ शोध घेत अटक केल्याचे सांगितले. अक्षय राजेंद्र जाधव (२८, रा. कर्वेनगर), शिवाजी गोविंदराव सांगोले (३४, रा. नऱ्हे) आणि भरत बबन मारणे (४५, रा. रामनगर, वारजे) अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा जी या महिलेच्या नावे असलेल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून कोल्हे यांना वारजे परिसरातील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवले होते. कोल्हे संबंधित हॉटेलमध्ये गेले असता तेथे अनाेळखी तीन जणांनी आपण सायबर पोलिस असल्याचे त्यांना सांगितले. तसेच तू मुलींना ट्रॅप करताे, तुझी चाैकशी करायची असल्याचे सांगून चाैकीला चल म्हणत, परिसरातील एका एटीएम सेंटरला घेऊन गेले. तेथे त्यांनी कोल्हे यांच्या एटीएमधून ५३ हजार ५०० रुपये काढून घेत पोबारा केला होता.दरम्यान तपास पथकाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे यांना तांत्रिक तपासाआधारे पोलिस अंमलदार अमोल सुतकर यांनी या प्रकरणाची संबंधित आरोपी हॉटेल स्वर्णा येथे असल्याची माहिती मिळाली, त्यावरून पोलिसांना अक्षय जाधव याला ताब्यात घेत, त्याच्या अन्य साथीदारांविषयी विचारणा केली. यानंतर पोलिसांनी शिवाजी सांगोले आणि भरत मारणे यांना अटक केली.
ही कामगिरी वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल जैतापुकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलिस अंमलदार अमोल राऊत, अमोल सुतकर, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, अजय कामठे आणि राहुल हंडाळ यांनी केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ए. बी. ओलेकर करत आहेत.