पुणे : राजगड पोलीस ठाण्याअंतर्गत खेड शिवापूर पोलीस चौकीतील पोलीस हवालदाराच्या डोक्यात खुर्ची घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी गुलटेकडी परिसरात सापळा रचून पकडले. आरोपीने गुन्हयाची कबुली दिल्याने त्याला पुढील तपासासाठी राजगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
रोहन गौतम साळवे (वय २४ , रा. कल्याण ता.हवेली पुणे) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी राहुल कोल्हे हे काम करीत असताना त्यांच्या डोक्यात खुर्ची घालून साहित्याचे नुकसान करून आरोपी रोहन पसार झाला होता. त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे आणि पोलीस कर्मचा-याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्हयातील आरोपी हा स्वारगेट येथील गुलटेकडी परिसरामध्ये आल्याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अंमलदार अनिस शेख व रमेश चव्हाण यांना माहिती मिळाली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे , पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले व पोलीस अंमलदार अनिस शेख, रमेश चव्हाण, सोमनाथ कांबळे यांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला. आरोपी दिसल्यानंतर शिताफीने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे गुन्हयाची चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. त्याला पुढील तपासासाठी राजगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.