पुणे : पुण्यातील सर्वांत जुन्या गुन्हेगारी टोळ्यांपैकी एक असलेली आंदेकर टोळी असून, या टोळीचे म्होरके बंडू आंदेकर आहेत. बंडू आंदेकर हे वनराज आंदेकरचे वडील आहेत. आंदेकर टोळी गेली पंचवीस वर्षे पुण्यात गुन्हेगारी कारवाया करीत असून, प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खुनाच्या प्रकरणी बंडू ऊर्फ सूर्यकांत आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षाही झाली आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत आंदेकरविरुद्ध १९८५ पासून खून, खुनाचे प्रयत्न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे, अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पुण्यातील फरासखाना, खडक व समर्थ या पोलिस ठाण्यांत, तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाण्यात दाखल आहेत. आंदेकर-माळवदकर टोळीयुद्धातून झालेल्या खून प्रकरणात सूर्यकांत आंदेकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जन्मठेपेची शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवायांना सुरुवात केली. त्याच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिक तक्रार करण्यासही पुढे येत नव्हते.
सू्र्यकांत आंदेकरचा भाऊ उदयकांत हा पुणे महापालिकेत २०१२ पासून राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक होता. गेली काही वर्षे आंदेकर टोळीचा वरचष्मा कमी झाला होता. कुडले आणि आंदेकर टोळीतील काही जणांचे वाद होते. त्यातून कुडलेच्या खुनाचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. गेले काही दिवस कुडले याच्यामुळे आपल्या टोळीचे वर्चस्व कमी होत असल्याचा राग आंदेकर टोळीत होता. आंदेकर टोळीवर मोक्काअंतर्गत करवाई करण्यात आली आहे. मोक्काची कारवाई झालेला कुख्यात गुंड बंडू आंदेकरसह सहाजणांना ५ जानेवारी २०२४ रोजी जामीन मिळाला होता.
राजकीय व्यक्तींच्या पुण्यात झालेल्या हत्या
१. २००३ - भाजप आमदार माधुरी मिसाळ यांचे पती सतीश मिसाळ यांची हत्या,२. २०२१ - शिवसेना कसबा युवा सेनेचे विभाग प्रमुख दीपक विजय मारटकर यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार, राजकीय वैरातून हत्या झाली होती. दोनजणांना अटक करण्यात आली.३. २०२३ पुण्यातील मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची शनिवारी १ एप्रिलला प्रतिशिर्डी साईबाबांच्या मंदिरासमोर कोयत्याने वार करून हत्या. प्रवीण गोपाळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले होते.