पुणे : कल्याणीनगर अपघातातील मुलाला प्रौढ ठरवून त्याविरोधात फौजदारी खटला चालविण्यासाठी पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जावर पुढील सुनावणी आता १८ नोव्हेंबरला होणार आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने पोर्शे अपघात प्रकरणातील सर्व कागदपत्रे बाल न्याय मंडळाकडून मागविली आहेत. ती अद्याप मंडळाकडे परत आलेली नसल्याने सोमवारी (दि. २१) होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती तपास अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली.
या प्रकरणाची सुनावणी सोमवारी (दि. २१) होणार होती. त्यादृष्टीने विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सर्व तयारी केली होती. मात्र, या प्रकरणाच्या पोलिस रेकॉर्डसह सर्व कागदपत्रे महाजन कोर्टाने काही दिवसांपूर्वीच बाल न्याय मंडळाकडून मागविली आहेत. ती कागदपत्रे आल्यानंतरच पुढील सुनावणी होणार आहे. त्यासाठी दि. १८ नोव्हेंबर ही पुढील तारीख देण्यात आली आहे. या तारखेला पोर्शे कार मिळण्याबाबत आणि मुलाच्या पासपोर्टबाबत दाखल केलेल्या अर्जावर देखील याच दिवशी युक्तिवाद होणार आहे.
अपघाताच्या गुन्ह्यात मुलाला जामीन झाला आहे. तर त्याचे आई-वडील आणि ‘ससून’मधील डॉक्टर अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, अपघातप्रकरणी मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात विविध कलमांनुसार कलमवाढ करण्यात आली आहे. तपासात मुलाचा इतर गुन्ह्यांत देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने ही कलमवाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता चौकशी केली जाणार आहे.