पुणे : ओएनजीसी कंपनीचे कंत्राट मिळवून देतो, असे सांगून १ कोटी २७ लाख ५० हजार रुपयांची पुण्यातील व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणात गुजरात बडोदा येथील व्यक्तीला कनिष्ठ न्यायालयाने मंजूर केलेला जामीन सत्र न्यायालयाने रद्द केला. सत्र न्यायाधीश व्ही.डी. निंबाळकर यांनी हा आदेश दिला आहे.
धर्मेश प्रफुलचंद्र शहा याचा जामीन रद्द करण्यात आला आहे. पुणे येथील व्यावसायिक विक्रम रघुनाथ नलावडे (रा. औंध) यांची डिसेंबर 2019 ते डिसेंबर 2022 या दरम्यान १ कोटी २७ लाख ५० हजार रुपयांची ही रक्कम घेऊन फसवणूक करण्यात आली होती. नलावडे यांनी याबाबत डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती, त्यानुसार गुन्हा दाखल आहे. शहा याला या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. हा जामीन रद्द करण्यासाठी फिर्यादी नलावडे यांनी अॅड. हेमंत झंजाड यांच्या मार्फत सत्र न्यायालयात अर्ज केला होता. झंजाड यांना अॅड.राहुल खरे, अॅड.अनिल हुडे, अॅड. साईराज शिरसाट यांनी सहकार्य केले.
अॅड. झंजाड यानी युक्तिवाद केला की, कनिष्ठ न्यायालयामध्ये आरोपीने बनावट कागदपत्र तयार करून ते खरे आहेत, असे भासवून न्यायालयाची दिशाभूल करून जामीन मंजूर करून घेतला आहे. तसेच, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून देशातील अनेक राज्यात त्याने अनेक लोकांना ओएनजीसी कंपनीचे कंत्राट मिळवून देतो असे सांगून कोट्यावधी रुपयांना फसवलेले आहे. तसेच, तो फिर्यादीला पैसे द्यायला तयार आहे व त्या आधारे जामीन मिळवला होता. परंतु त्यांनी पैसेही दिले नाहीत, त्यामुळे जामीन रद्द करणाची मागणी करण्यात आली. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन रद्द् केला. तसेच, न्यायालयात शरण येण्यास सांगितले आहे.