बारामतीकरांनी भाजपबरोबर जाण्यासाठी मते दिली नाहीत; शरद पवारांचा अजित पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 02:58 PM2024-04-08T14:58:45+5:302024-04-08T14:59:32+5:30
विधानसभा, राज्यसभा, लोकसभा या तिन्ही ठीकाणी मी गेली ५६ वर्ष काम करतोय, वय काढणाऱ्या अजित पवारांचा ८४ वयाचा मुद्दा खोडुन काढला.
बारामती : गेल्या १० ,२० वर्षात बारामतीत स्थानिक राजकारणात लक्ष दिले नाही. चांगले काम करा, अडचण आल्यास सांगा, अशी भुमिका घेतली. मात्र, काहींनी टाेकाची भुमिका घेतली. भाजप हा सर्वसामान्यांच्या हिताची जपणुक करणारा पक्ष नाही. बारामतीकरांनी त्यांच्याबरोबर जाण्यासाठी मते दिली नाहीत. असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.
सोमवारी (दि ८) शरद पवार यांनी जिरायती भागाचा दाैरा केला. यावेळी उंडवडी क.प. येथे आयोजित सभेत पवार यांनी मोदींसह अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी शरद पवार म्हणाले, विधानसभेला बारामतीकरांनी राष्ट्रवादीला मते दिली. त्यांनी निवडलेला रस्ता चुकीचा असल्याचे पवार यांनी सांगत अजित पवार यांना चिमटे काढले.
पवार पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री पदापासुन पंतप्रधान पदापर्यंत पोहचले. त्यांच्या गुजरातला केंद्रात कृषिमंत्री असताना प्रचंड मदत केली. त्यावेळी ते कोणत्या पक्षात आहेत ते पाहिले नाही. त्या राज्यातील शेतकरी सुखी करण्यासाठी मदत करण्याचे धोरण नेहमी राबविले. शेतकऱ्यांसाठी ती मदत केली. एके दिवशी ते बारामतीत आले. त्यांनी माझ बोट धरुन शरद पवारांनी शिकविल्याचे सांगितले. आज तेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वेगळी भुमिका घेतात. त्यांच्यावर टीेकाटीप्पणी करणाऱ्या झारखंड, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकतात. हि लोकशाही नाही,तर हुकुमशाही आहे. ती न आवरल्यास देशात चित्र बदलेल. मुठभर लोकांच्या हाती सत्ता जाईल. आज सर्व सत्ता मोदींच्या हातात केंद्रीत आहे, त्यातून आपल्याला सुटका करावयाची असल्याचे पवार म्हणाले. यावेळी काही लोक गेले. त्यांनी पक्ष सोडला. आता आणखी इतिहास सांगण्याची गरज नाही. राष्ट्रवादी पक्ष कोणी स्थापन केला, त्यांना निवडुक कोणी आणले, त्यांना मंत्रीपदे कोणी दिली, असा सवाल शरद पवार यांनी केेला.
...ज्यांना अधिकार दिले, त्यांनी काम केलं नाही.
‘जनाई शिरसाई’ बाबत मला माहिती नव्हते. मी आता त्यामध्ये लक्ष घालणार आहे. काम कसं होत नाही बघतो. ज्यांच्यावर जबाबदारी दिली,अधिकार दिले त्यांनी काम केलं नाही. आता मी काम पूर्ण करणार आहे. कारण ही सर्व माझी माणसं आहेत, असा अप्रत्यक्ष टोला शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला.
...माझं वय काढू नका,तुम्ही काय बघितले आहे माझं ?
विरोधक म्हणतात माझं वय ८४ वय झालं. आता ८४ वर्षाचा योध्दा काय करणार, त्यांना माझं सांगण आहे, माझं वय काढू नका, तुम्ही काय बघितले आहे माझं ? मी थांबणार नाही. तुम्ही मला काय केलं नाही. चार वेळा मुख्यमंत्री, केंद्रात कृषी मंत्री केलं. विधानसभा, राज्यसभा , लोकसभा या तिन्ही ठीकाणी मी गेली ५६ वर्ष काम करत आहे. मला तुम्ही लोकांनी एकही दिवस सुट्टी दिली नाही. तुमच्यासाठी शेवटपर्यंत काम करण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे,अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवार यांना सुनावले. अजित पवार यांनी मांडलेला पवार यांच्या ८४ वयाचा मुद्दा खोडुन काढला.