पुणे: निवडणूक व त्यातही ती लोकसभेची असेल तर उमेदवाराला तो कितीही भारी असला तरी थकवतेच. सकाळ, संध्याकाळ वेगवेगळ्या परिसरात फिरावे लागते. विशेषत: वसाहतींमध्ये. तिथला माणसांचा तसा राजकारणाशी काहीही संबध नसतो, पण स्थानिक नेते आपापल्या नेत्यांना वसाहतींमध्ये घेऊन जाण्यासाठी आग्रही असतात व तिथल्या मतांच्या एकूण संख्येमुळे उमेदवारालाही ते नाकारता येत नाही.
अशा वेळी थकल्याभागल्या नेत्याला काही आनंदांचे क्षणही मिळतात. चांगल्या सुशिक्षितांच्या सोसायट्यांमध्ये मिळणार नाही असे हे क्षण वस्त्यांमध्येच अनुभवाला येतात. अशाच एका क्षणाचे हे छायाचित्र आहे.
बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या लोकसभेच्या एका निवडणुक प्रचारफेरीतील. जनता वसाहतीमधील. तिथे सकाळी ८ वाजल्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत फिरल्यानंतर गाडगीळही दमले. हरहुन्नरी असलेले शांतीलाल सुरतवाला यांनी ते ओळखले. स्थानिक नगरसेवक बाळासाहेब राऊत यांच्याबरोबर बोलून त्यांनी लगेचच एका घरात गाडगीळ यांना थोडावेळ बसता येईल अशी व्यवस्था केली. त्या घरातील महिलांनाही आपल्या घरी कोणी मोठा माणूस आला आहे हे लगेच समजले. ते गाडगीळ आहेत, लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आहेत, म्हटल्यावर त्यांनी लगेचच ताम्हण आणले, त्यात निरांजन ठेवली. ती पेटवली, गाडगीळांना ते औक्षण नाकारता आले नाही. घरातील एका वृद्धेने त्यांना तिथेच आशीर्वादही दिली.