पुणे: हेमंत, तुला उमेदवारी मिळाली, अभिनंदन. मात्र, याच मतदारसंघातील सन १९९२च्या विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला होता, हे लक्षात ठेव व सावध राहा, असा सल्ला भाजपचे उमेदवार रासने यांना पक्षातीलच एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिला आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघावर मागील अनेक वर्षे भाजपचे वर्चस्व आहे. सन १९९१ मध्ये अण्णा जोशी या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांना त्यानंतर खासदारकीची उमेदवारी मिळाली. त्यातही ते विजयी झाले व त्यानंतर कसब्यात पोटनिवडणूक झाली. त्यात भाजपने तत्कालीन नगरसेवक व विद्यमान खासदार गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी महापौर वसंत थोरात होते. त्यावेळी भाजपतील ५ नगरसेवक अचानक फुटले व काँग्रेसमध्ये गेले. बापट यांचा पराभव झाला व थोरात विजयी झाले.
आताही याच मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. भाजपची उमेदवारी हेमंत रासने यांना मिळाली होती. तेही माजी नगरसेवक आहेत. स्थायी समितीचे माजी सभापतीही आहेत. त्यामुळेच भाजपच्या त्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने रासने यांना खास संदेश पाठवत या पोटनिवडणुकीचे स्मरण करून दिले आहे. सलग ५ वेळा विजयी होऊन बापट यांनी मतदारसंघ पक्का केला आहे. मात्र, त्यांनाही त्या पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागला, ते लक्षात ठेव व जोरदार काम कर, अशा शुभेच्छा त्या पदाधिकाऱ्याने रासने यांना दिल्या आहेत.