कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील भीमा नदीच्या पाण्यामध्ये २१ मे रोजी काही मुले पोहण्यासाठी गेले असताना दोन मुले पाण्यात बुडाल्याची घटना घडली. दिवसभर मुलांना पाण्यात शोधण्यात पोलीस व पुणे महानगर विकास प्राधिकरणचे अग्नीशमक दलाच्या जवानांना अपयश आले. आज अखेर दुपारच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या अनुराग विजय मांदळे व गौरव गुरुलिंग स्वामी या दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.
कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील भीमा नदीच्या पाण्यामध्ये २१ मे रोजी सकाळच्या सुमारास काही मुले पोहण्यासाठी गेली होती. दुपारी अनुराग मांदळे व गौरव स्वामी हे दोघे पाण्यात बुडाली होती. त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तसेच पुणे महानगर विकास प्राधिकरणचे अग्नीशमक दलाच्या जवानांनी मुलांचा पाण्यात शोध घेतला होता. मात्र त्यांना शोधण्यात अपयश आले होते. त्यामुळे आज सकाळपासून पुन्हा पुणे महानगर विकास प्राधिकरणचे अग्नीशमक दलाचे अधिकारी आणि पोलिसांनी पाण्यात शोधकार्य सुरु केले. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गौरव स्वामी तर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास या दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. सदर दुर्घटनेतील दोन्ही मुले आई वडिलांची एकुलती एक असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे . याबाबत वैजनाथ बाबुराव स्वामी वय ४२ रा. ढेरंगे वस्ती कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.