पुणे: हवामानातील बदलातून पुणे शहरात सकाळी पावसाची भुरभुर आली. त्याचा परिणाम कामाला जात असलेल्या वाहनचालकांना सहन करावा लागला असून अनेक ठिकाणी दुचाकी घसरण्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील किमान १० ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. रस्त्यावर वाहनांमधून ऑईल सांडलेले होते. अतिशय हलका पाऊस झाल्याने पाणी आणि ऑईल यांचे मिश्रण झाल्याने छोटी चाके असलेल्या स्कुटरेट त्यावरुन जाताच त्यांची रस्त्यावरील पकड सैल होते व चाक ऑईलमुळे घसरते.
सेनापती बापट रोडवरील सिंबायोसिसवरील उतारावर सकाळी अनेक वाहने घसरली. काही दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. बिबवेवाडी, फातिमानगर, कात्रज येथील राजीव गांधी उद्यानासमोर, वानवडी, राजभवन समोरील रोड, म्हात्रे पुलाजवळ अशा जवळपास १० ठिकाणी वाहने घसरण्याच्या घटना घडल्या आहेत. वाहनचालकांनी विशेषत: दुचाकीस्वारांनी वाहने सावकाश चालवावी, ओल्या रस्त्यावरुन जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.