पुणे : एक अविश्वसनीय कथा आहे, तेलंगे कुटुंबाची. मोनिका तेलंगे असं त्यांचं नाव. एक आई आणि कचरा वेचक अशी तिची दुहेरी भूमिका. कचरा गाडी येण्याची वाट पाहत असताना तिचा मुलगा, मंथनच्या शाळेच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून येणारे अभ्यासाचे संदेश ती वाचत असे. तिलाही दहावी पूर्ण करायची होती. कारण इतर अभ्यासक्रम आणि नोकऱ्यांसाठीही ती पात्रता आवश्यक होती. मंथन आणि मोनिकाने परीक्षेसाठी एकत्र अभ्यास केला. मुलाला ६४ टक्के तर आईला ५१.८ टक्के असे घवघवीत यश मिळविले.
आई म्हणते की तिला मंथनसारखा शिक्षक मिळाल्यानेच हे यश मिळवता आले. डॉक्टर बनू इच्छिणारा मंथन आता नीटची तयारी करणार आहे, तर मोनिकाला नर्सिंगचा कोर्स आणि बारावीची तयारी करायची आहे. यांच्या जिद्दीची ही कहाणी इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
घरची अत्यंत गरिबी, शिकण्यासाठी ना पुरेशी साधनं ना पोषक वातावरण. तरी बिकट परिस्थितीतही प्रचंड आव्हानांवर मात करीत त्यांनी दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यांची स्वप्न खूप मोठी आहेत. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कष्टाची लढाई सुरूच आहे. हा कचरावेचकांच्या कष्टाचा पहिला विजय आहे. प्रत्येकाचीच कहाणी ही थक्क करणारी आहे.
आणखी एक नाव म्हणजे जयेश नवगिरे. चौदा वर्षांपूर्वी त्याचे वडील सोडून गेल्यापासून तो आणि त्याची बहीण त्यांच्या आईसोबत एकटेच राहतात. मंदाकिनी, त्याची आई, कुटुंबातील एकमेव कमावती असून, अनेक नोकऱ्या करून काबाडकष्ट करतात. सकाळी स्वच्छतर्फे घर घर कचरा वेचणे, आणि दुपारी घरकामे करणे, या आईच्या कष्टाची जाणीव ठेवून, जयेश त्याच्या शिक्षणासोबतच त्याच्या पुढील शिक्षणासाठी मांजरी येथील बिसलेरी कारखान्यात काम करीत आहे. जयेशने कष्टाचे चीज करून ६४ टक्के मार्क मिळवले आहेत.
सोनाली किसन राठोड हिची कथाही अशीच वेगळी आहे. ती रामा किसन राठोड यांची बहीण त्यांचे आई-वडील १० वर्षांपूर्वी वारले. यामुळे भावाने शिक्षणासाठी माहेर या संस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी तिला पाठवले. तिने दहावीपर्यंतचे शिक्षण तिथेच पूर्ण केले. घरी भाऊ, वहिनी आणि मामा असतात, भाऊ रामा हा कचरा वेचक म्हणून काम करतो, आणि मामाच्या भंगारच्या दुकानात काम करतो, सोनालीने घरापासून दूर राहून सुद्धा ६५ टक्के गुण मिळवले.